Friday 24 November 2017



         15 हजार 556 कर्क रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा दिलासा 
  एकूण 26 हजार रुग्णांवर उपचार
  2896 हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया
         वर्धा, दि 23-जिमाका :-  कर्करोगाचे नाव जरी उच्चारले तरी हृदयात धडकी भरते.कारण या आजारावर अजूनही रामबाण उपाय सापडलेला नाही. हा  आजार होण्याची  अनिश्चितता आणि झालेला आजार बरा होण्यासाठी करावी लागणारे त्रासदायक   उपचार यामुळे या आजाराविषयी एक भीतीदायक वातावरण समाजात आहे. या आजारावर होणारा खर्च  लक्षात घेऊनच गरिबांना यासाठी योग्य उपचार मिळावेत म्हणून शासनाने  कर्करोगाला  महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट  केले. याचा लाभ  वर्धा जिल्ह्यातील  15 हजार 556  कर्क रुग्णांना झाला असून यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार माफक दरात मिळवून देण्यासाठी शासन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबवित  आहे. पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने राबविण्यात येत होती.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी  1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले, केशरी शिधापत्रिका धारक  कुटुंब आणि आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंब पात्र आहेत. योजनेत पात्र कुटुंबाना 971 आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया  तसेच 121 पाठपुरावा सेवा मोफत दिल्या जातात. एका कुटुंबाला एक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेतून मोफत मिळतात. याचा लाभ अनेक रुग्णांना होत असून यामुळे  दुर्मिळ आणि मोठ्या  आजारांवर गरिबांना उपचार करून घेणे शक्य झाले आहे.
यासाठी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, आणि आर्वी येथील डॉ राणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अंगीकृत केली आहेत. वर्धा जिल्ह्यात अंगीकृत रुग्णालयात आतापर्यंत 26 हजार रुग्णांनी  या योजनेचा लाभ घेतला आहे.  यामध्ये 2 हजार 896 हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया, 15 हजार 526 कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार,  14 रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण  तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे.यासाठी शासनाने 96 कोटी 33 लक्ष 46 हजार 773 रुपये उपचारासाठी रुग्णालयाना  दिले आहेत.  यामुळे सामान्य गरीब माणसाला मोफत व चांगले उपचार मिळत आहे.

No comments:

Post a Comment