Saturday 1 September 2018

स्पर्धा परीक्षेची तयारी प्रामाणिकपणे करा- नितेश कराळे * लोकराज्य वाचक अभियानाचा थाटात शुभारंभ * अभियानात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्धा, दि 2:- बेरोजगारीच्या वातावरणात नोकरी मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करा किंवा मरा याप्रमाणे अभ्यास केला तर नक्की यश मिळते. असे प्रतिपादन पुणेरी पॅटर्न या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक नितेश कराळे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालाया मार्फत लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयच्या वतीने शासकीय ग्रंथालयाच्या सहकार्याने जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला वक्ते पंकज वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे उपस्थित होत्या. जीवन खूप सुंदर आहे. खूप हुशार विद्यार्थीच जीवनात यशस्वी होतात असे नाही. शालेय जीवनात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे मोठे अधिकारी, नेते झाल्याची उदाहरणें आहेत. परिस्थितीचे भान आल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे झोकून देऊन सर्व शक्तीनिशी प्रयत्न केल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असल्याचे श्री कराळे यांनी सांगितले. अभ्यासक्रम सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजून घेतला तर तो रटाळ वाटत नाही. दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा तुमच्या कल्पना शक्तीला वापर करा. जगात तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही याची जाणीव ठेवून तुमचा यशस्वी होण्याचा प्रयत्न निरंतर करत राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंकज वंजारी मार्गदर्शन करताना म्हणाले, मनुष्याच्या यशाचे श्रेय हे त्याच्या ब्रेन प्रोग्रामिंग वर अवलंबून असते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलं जे अनुभवतात, बघतात, शिकतात त्यावरच त्यांचं पुढचं यशापयश अबलंबून असतं. तुमच्या मेंदुला ज्याप्रमाणे आदेश दिले जातात त्याप्रमाणे तो वागत असतो. हे समजावून सांगताना त्यांनी अनेक उदाहरणांचा दाखला दिला. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मेंदूचे प्रोग्रामिंग व्यवस्थित होणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मनीषा सावळे यांनी प्रास्ताविकातून लोकराज्य वाचक अभियानाचे महत्व सांगताना स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिक कसे उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सर्व महाविद्यालयात असे वाचक मेळावे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रश्न मंजुषा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना लोकराज्य मासिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण वानखेडे यांनी केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, मनोज सोयाम, श्री चिटटवार, श्री धमाने आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कर्मचा-यांनी यासाठी परिश्रम घेतले . 000000


No comments:

Post a Comment