Wednesday 29 August 2018



महात्मा गांधीचे मुल्य रुजविण्यासाठी  विविध कार्यक्रमाचे आयोजन
Ø जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
Ø ‘रन फॉर पिस मॅराथॉन स्पर्धा

           वर्धा , दि. 28(जिमाका) : महात्मा गांधींचे विचार आणि मूल्य या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विशेषतः  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये  रूजावेत म्हणून गांधी जयंतीच्या पर्वावर जिल्हा प्रशासन विशेष कार्यक्रमाचे आयोजनाचे नियोजन करीत  आहे. यामध्ये महात्मा गांधींनी दिलेल्या स्वदेशी आणि श्रमसंस्काराच्या मूल्यांसोबतच त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा आणि   नई तालिम सारख्या शिक्षण पद्धतीचा समावेश या उपक्रमात असणार आहे. यासाठी आठवडाभर भरगच्च कार्यक्रम राहणार असून 2 ऑक्टोबरला वर्धेकराना  रन फॉर पीस या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
        महात्मा गांधींची 150 वे जयंती वर्षात भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.  यामध्ये 14 वर्ष वास्तव्य केलेल्या वर्धा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधींचा सर्वात अमूल्य देणं म्हणजे त्यांनी दिलेला शांती आणि अहिंसेचा संदेश. आजच्या वातावरणात हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शांती दौड या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 2 ऑक्टोबरला करण्यात येणार. यामध्ये 16 ते 21 वयोगटातील विद्यार्थी आणि खुला गट अशा दोन प्रकारात ही स्पर्धा होईल. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग राहावा यासाठी वयस्क लोकांसाठी स्वदेश फेरी ही चालण्याची स्पर्धा ठेवण्यात येणार आहे.
          मूल्य आणि संस्कार रुजविण्याचे वय हे 14 वर्षापर्यंतच असते. आजकाल शाळांमध्ये पाठ्यक्रमावर जास्त भर दिला जातो मात्र जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य आणि मूल्ये शिकवली जात नाहीत.  महात्मा गांधींनी दिलेला स्वदेशी आणि श्रम संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी चरख्यावर सूत कताई स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांना चरखा खरेदी करून विद्यार्थ्यांना चरखा चालविण्याचे आणि सूत कताईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला ही स्पर्धा घेण्यात येईल.
         महात्मा गांधींना समजून घेण्यासाठी  त्यांचे आत्मचरित्र वाचण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी हे वाचावे म्हणून विविध स्पर्धाचे आयोजनही करण्यात येत आहे.  गांधींच्या जीवनावर आधारित वक्तृत्व, नाट्य, नृत्य, गीत गायन, चित्रकला, कविता, आणि लेखन स्पर्धेचा यामध्ये समावेश असणार आहे.
          या संदर्भात विकास भवन येथे झालेल्या बैठकिला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व  शाळांचे मुख्याद्यापक यांना तयार करण्याच्या सूचना दिल्यात. या बैठकिला सहायक जिल्हाधिकारी मनोज जिंदाल उपस्थित होते.
                                      0000

No comments:

Post a Comment