Tuesday 18 December 2012

संत गाडगे बाबा मिशनव्दारे विदर्भातील गरीब रुग्णांसाठी मुंबईत निवारा



·         गरीब रुग्णांना निवास व भोजनाची सुविधा
·        मुंबईत मिशनच्या तीन धर्मशाळांव्दारे विदर्भ व मराठवाड्यातील रुग्णांना निवास  सुविधा

वर्धा, दि. 18   अत्यंत दुर्धर आजारावरील उपचारांसाठी रुग्णासह नातेवाईकांना मुंबईसारख्या महानगरामध्ये निवास व भोजनाची सोय व्हावी, यासाठी संत गाडगे बाबा मिशनव्दारे तीन धर्मशाळा सुरु करण्यात आल्या असून या धर्मशाळेमध्ये कर्करोगासह इतर आजारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था अत्यंत अल्प दरात करुन संत गाडगे बाबांच्या कार्याचा वसा सातत्याने सुरु ठेवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुंबई येथील मफतलाल मोहनलाल धर्मशाळा तसेच संत गाडगे बाबा धर्मशाळा दादर येथे बांधण्यात आली आहे. या सर्व धर्मशाळेचे व्यवस्थापन अमोल एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
विदर्भातून अत्यंत दुर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी बहुतांश रुग्ण मुंबईला जातात. मुंबई येथील निवास व भोजनाची अत्यंत खर्चिक व्यवस्था असल्यामुळे संत गाडगे बाबा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन एकनाथ ठाकूर यांनी धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेतला.
संत गाडगे बाबा यांनी  1956 मध्ये जे.जे. हॉस्पीटलला भेट दिली असता येथील रुग्णांची व्यथा बघून  रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची व्यवस्था तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार मफतलाल मेहता यांनी जागा मिळवून बांधकाम पूर्ण केले. यासाठी लोकवर्गर्णीतून 3 कोटी 80 लाख रुपये गोळा करुन जी. टी. हॉस्पीटलच्या शेजारी  प्रशस्त ईमारत बांधली. त्यासोबतच प्रशासनाकडून दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकनाथ ठाकूर यांनी रुग्णांच्या नातेवाईकासाठी प्रशस्त धर्मशाळा बांधली.
विदर्भ तसेच मराठवाड्यातूनही मुंबईला औषधोपचारासाठी तसेच शस्त्राक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जे.जे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी तिसरी धर्मशाळा बांधली. आज तीनही धर्मशाळा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या सेवेत असून अमोल ठाकूर निस्पृहपणे संत गाडगे बाबा धर्मशाळेचे व्यवस्थापन चालवित आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवास व भोजन उपलब्ध होत असून वाशीम येथील मधुसुदन अग्रवाल यांनीही रुग्णांच्या नातेवाईकासाठी विशेष सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था केली असून मागील तीन वर्षापासून ती अविरतपणे सुरु आहे. प्रवीण वानखडे यांच्यासारखे निस्वार्थ सेवा देणारे गाडगे महाराजांचे भक्तगण रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.
गाडगे बाबा यांनी आयुष्यभर दीन दुबळ्यांची तसेच रुग्णांची सेवा केली. हीच सेवा अखंडपणे सुरु रहावी यासाठी गाडगे महाराज मिशनचा प्रयत्न असून विदर्भातील रुग्णांना दादर, भायखळा व जे.जे. रुग्णालयाच्या परिसरातील धर्मशाळा आपल्या हक्काचे स्थान म्हणून परिचित झाले आहे. लाखो रुग्णांचे नातेवाईक उपचारादरम्यान येथे वास्तव्याला असतात. त्यांची संपूर्ण जबाबदारी संत गाडगे बाबा मिशनव्दारे घेतली जाते.
00000

No comments:

Post a Comment