Thursday 20 December 2012

राष्ट्रीयकृत बॅकांनी लाभार्थ्यांची खाती तातडीने उघडावी -आनंद पाटील



            वर्धा ,दिनांक 20 : केंद्र व राज्य पुरस्कृत असलेल्या योजनेतील अनुदान थेट संबंधित लाभार्थ्यांनाच मिळावे  यासाठी राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये खाते काढण्याची  मोहीम जिल्ह्यात  यापूर्वीपासून सुरु होती. वर्धा जिल्हा हा प्रायोगिक तत्वावर  (plot project)  घेतला असून ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही बॅकेत खाते उघडले  नाही अशा लाभार्थ्यांसाठी  युद्धपातळीवर मोहीम राबवून शुन्य रकमेवर बॅकेत खाते उघडण्याचे निर्देश  केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक आनंद पाटील  यांनी बॅकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
            काल विकास  भवनामध्ये बॅंकेच्या अधिकाऱ्यांची व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बॅकेत खाते उघडण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.नविन सोना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, निवासी उपजिल्हाधिकारी गाडे, अग्रणी बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मशानकर व इतर बॅकेचे वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.
            वर्धा जिल्ह्याने अल्पावधीतच खाते उघडण्याचे काम बॅकांनी चांगले केल्याची प्रशंसा करुन संचालक आनंद पाटील म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील गरीबांना न्याय देण्याची अपूर्व अशी संधी वर्धाकरांसाठी चालून आली आहे. त्या संधीचे निश्चितच चांगले परिणाम येत्या चार ते पाच दिवसात दिसून  येतील अशी आशा व्यक्त करुन ते म्हणाले की, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही बॅंकेत खाते उघडले नाही. अश्या  लाभार्थ्यांना भेटून  योजनेचे गांर्भिय सांगून खाते उघडण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात बॅकेत खाते उघडणाचे सुमारे  90 टक्के काम झाले असून अजूनही सुमारे 10 टक्के काम शिल्लक  आहे. हे काम अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी येथील  जिल्हा प्रशासन  संपूर्णपणे सहकार्य करतील . लाभार्थ्यांनी काढलेले बॅंके खात्यामध्ये आधार कार्डक्रमांकाची नोंद घेण्यात यावी. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बनलेले नाही अशा लाभार्थ्यांचे बॅंकेमध्ये  खाते शुन्य रकमेवर उघडण्यात यावे . यावेळी  शिष्यवृत्ती मिळणाऱ्या  विद्यार्थ्यांचे बॅंकखाते तसेच  जननी सुरक्षा  योजना लाभार्थ्यांचे  बँक खाते तातडीने उघडावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.  यावेळी बँक अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करुन गरीब लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
            यावेळी जिल्हाधिकारी सोना यांनी बॅकेत खाते उघडण्यासाठी केलेल्या प्रगतीचे सादरीकरण केले. तसेच आधार कार्डच्या प्रगती विषयी माहिती सांगितली. येत्या चार पाच दिवसांमध्ये बॅकेत खाते उघडण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश  यावेळी दिले.
याप्रसंगी जिल्ह्यातील बॅंकनिहाय आढावा बॅकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी,  जिल्हा शल्य चिकित्सक व महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची माहिती सादर  केली.
यावेळी जिल्ह्यातील सर्व बॅकेचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                               000 0000

No comments:

Post a Comment