Wednesday 28 February 2018



वर्धेत टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू
Ø खासदार रामदास तडस यांचे हस्ते उदघाटन
Ø विदर्भातील पहिले केंद्र वर्धेत.
Ø मुस्लीम बांधवांसाठी जास्त फायदेशीर ठरणार
वर्धा दि २८ :- माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी अत्यंत आवश्यक असणारे पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली याचा मनस्वी आनंद आहे. या पारपत्र केंद्राचा लाभ जिल्ह्यातील परदेशी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसोबतच हज यात्रेसाठी जाणा-या मुस्लीम बांधवाना प्रामुख्याने होणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
मुख्य डाकघर येथे आयोजित पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्राचे उदघाटन श्री तडस यांनी केले . यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला हिंदी विश्व विद्यापिठाचे प्रकुलगुरू  आनंदवर्धन शर्मा, नागपूर विभागाचे महापोस्ट मास्टर मरियम्मा थॉमस,  क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी. एल. गौतम, नगराध्यक्ष अतुल तराळे उपस्थित होते.
ऐतिहासिक दृष्ट्या सबळ असूनही वर्धा जिल्हा विकासात मागे राहतो. मात्र यावेळी पारपत्र सेवा केंद्र मिळविण्यात  वर्धा जिल्ह्याने बाजी मारली आहे. यामुळे पारपत्र मिळविण्यासाठी नागपूरला जाण्यायेण्याचा लोकांचा त्रास कमी होईल.  पारपत्र कार्यालयाच्या अधिकाऱयांनी सतत 5 दिवस  काम करून हे केंद्र सुरू केले यासाठी त्यांनी सी एल गौतम यांचे आभार मानले. याचबरोबर आता प्रत्येक गावात टपाल कार्यालय हे ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या एक खोलीत सुरू करण्यात येईल असेही श्री तडस यांनी  सांगितले.
परदेशात पर्यटन , नोकरी, आणि व्यापार यासाठी आवश्यक असलेले पारपत्र सेवा केंद्र वर्धेत सुरू झाल्यामुळे वर्धेकरांच्या  स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. पारपत्र काढण्यासाठी अनेकदा शासकीय श्रम, दिवस वाया जातात. पण यामुळे त्यामध्ये बचत होईल, असे प्रो आनंदवर्धन शर्मा म्हणाले.
यावेळी बोलताना मारिअम्मा थॉमस यांनी टपाल कार्यालय हे केवळ पत्र पोहचविण्याचे कार्यालय राहिले नसून ते आता जनसेवा केंद्र झाले आहे. लवकरच पोस्ट पेमेंट बँक च्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आम आदमी साठी उपलब्ध होईल. अटल पेन्शन योजना, आधार अपडेशन आणि इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर योजना पोस्ट ऑफिसमध्ये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशात आतापर्यन्त केवळ 80 पारपत्र सेवा केंद्र सुरू होते.त्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागत होता. 24 जून 2017 रोजी विदेश मंत्र्यांनी टपाल कार्यालयासोबत जोडून पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आज देशात टपाल कार्यालयाच्या समन्वयाने 251 केंद्र सुरू होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.  पारपत्र काढण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज पासपोर्ट इंडिया च्या संकेतस्थळावर सादर करावा. त्यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर अपॉइंटमेंट साठी वेळ कळवला जाईल.  अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे आणि पोलीस चारित्र्य पडताळणी सहित फाईल नागपूर कार्यलयाला पाठवली जाईल. नागपूर कार्यालयातून पारपत्र बनून पोस्ट ऑफिसला मिळेल आणि नंतर ते अर्जदाराला पोस्टाने  पाठवण्यात  येईल. यासाठी पारपत्र विभागाचे चार कर्मच-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते कर्मचारी येथील केंद्र सांभाळतील अशी माहिती क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी एल गौतम यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी या पारपत्र सेवा केंद्रासाठी खासदार रामदास तडस यांचे आभार मानले.
                                       




No comments:

Post a Comment