Wednesday 7 March 2018



   31 मार्च पर्यंत जिल्हयातून प्लॉस्टीक हद्दपार करावे
                                                -जिल्हाधिकारी
 वर्धा, दि 6,(जिमाका)  महात्मा गांधीचा जिल्हा म्हणुन या जिल्हयाला वेगळे महत्व आहे. महात्मा गांधीनी अनुसरलेल्या पर्यावरणपुरक आणि निसर्गाला हानीकारक नसलेल्या वस्तूचा उपयोग करण्यावर लोकांनी भर दयावा. शासनाने गुढी पाडव्यापर्यंत प्लॉस्टीकमुक्त राज्य  करण्याचे जाहिर केले आहे. यामध्ये  वर्धा जिल्हयात संपूर्णपणे प्लॉस्टीक बंदी करण्यासाठी व्यापारी, दुकानदार, हॉटेल मालक यांनी स्वत:हून या मोहिमेत सहकार्य करावे, आणि  आर्थिक वर्ष संपतांना जिल्हयातून प्लॉस्टीकही हद्दपार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्हा प्लॉस्टीक मुक्त करण्यासाठी वर्धा शहरातील प्लॉस्टीकचे होलसेल विक्रेते, दुकानदार, हॉटेल मालक आणि  सर्व नगर परिषंदाचे मुख्याधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्लॉस्टीकचा वापर आणि त्याच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
प्लॉस्टीकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरण आणि नदी प्रदुषण मोठया प्रमाणात होत आहे. तसेच प्लॉस्टीक जाळल्यामुळे त्यापासून घातक वायू बाहेर पडतात. कच-यात प्लॉस्टीक मोठया प्रमाणात असल्यामुळे जणावराच्या पोटात प्लॉस्टीक बॅग सापडल्यामुळे त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर प्लॉस्टीक पिशवी किंवा डब्यात  साठवलेल्या अन्न पदार्थाचा उपयोग केल्यास कर्करोगाचा धोका संभवतो.  त्यामुळे प्लॉस्टीक पासुन निसर्गाचे आणि  प्राणीमात्राचे जीवन वाचविण्यासाठी प्लॉस्टीकला नकार दयावा.
दुकान किंवा व्यवसायाचा परवाना रद्द करणे किंवा दंड करणे हा प्रशासनाचा उद्देश नसुन लोकांनी स्वत:हून अविघटनशिल प्लॉस्टीकचा वापर करणे बंद करावे, हा मुख्य उद्देश आहे. कच-याचे विलगीकरण करुन त्याचे खतात रुपांतर करतांना प्लॉस्टीक हा महत्वाचा अडसर ठरत आहे. कच-यातील प्लॉस्टीकमुळे त्याचे खतात रुपांतर होत नाही. त्यामुळे कच-याचा ढीग दिवंसेदिवस वाढत जाणार आहे. ही बाब प्रशासनच नव्हे तर काही दिवसातच लोकांच्या समोर सर्वात मोठे संकट म्हणुन उभे राहील. त्यामुळे कचरा गोळा करणे आणि त्याचे विलगीकरण करणे यासाठी शासनाने कितीही निधी खर्च केला तरी त्याचा पाहिजे तसा फायदा दिसणार नाही. त्यामुळे लोकांनी जागरुक राहून  जाणिवपूवर्क प्लॉस्टीक वापरणे बंद करणे हाच त्यावरचा उपाय ठरेल. असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले,
प्लॉस्टीक पिशवी, चहाचे कप, प्लॉस्टीक पत्रावळी, थर्माकोल या सारख्या सर्व प्रकारच्या प्लॉस्टीक वस्तूना नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहे. याचा अवलंब प्रत्येकाने करावा. व्यापारी दुकानदार, हॉटेल मालक यांनी  ग्राहकांना प्लॉस्टीक पिशव्यामध्ये वस्तू देणे बंद करावे त्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात. तसेच ग्राहकांनी कायम स्वत: सोबत कापडी पिशव्या  ठेवाव्यात. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी होलसेल प्लॉस्टीक विक्रेते यांचे विनंती वरुन जिल्हाधिकारी यांनी 15  मार्च ऐवजी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ दिली. 
हॉटेल व कॅटरींगचा व्यवसाय करणारे यांच्या कडील शिल्लक अन्न पदार्थ घेऊन जाण्यासाठी नगर परिषदेची गाडी रात्री फिरणार आहे. त्याचा भ्रमणध्वनी  क्रमांक सर्वांना देण्यात येईल. सदर अन्न पदार्थ एकत्रित करुन कचरा डेपोमध्ये  बायोगॅस निर्मितीसाठी उपयोगात आणल्या जाईल. ही सेवा  1 एप्रिल पासुन सुरु करण्यात येणार असुन हॉटेल चालक, मंगल कार्यालय यांनी या सेवेचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
                                      0000



No comments:

Post a Comment