Wednesday 7 March 2018



देवळीला होणार अत्याधुनिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्र
वर्धा दि 7 :-  भारतात रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण मोठे आहे. वाहनचालकाची चूक आणि  अपघाताच्यावेळी  परिस्थिती हाताळण्याचे तंत्राचा अभाव यामुळे 78 टक्के अपघात होत आहेत. म्हणूनच रस्त्यावर व्यक्तीची सुरक्षितता हे ध्येय ठेऊन रस्ते  परिवहन व महामार्ग मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन चालक प्रशिक्षण केंद्र  सुरू करणार आहे. जिल्ह्यात देवळी येथे अत्याधुनिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाली असून लवकरच हे केंद्र  तयार होईल.
या केंद्राध्ये हलके वाहन,  4 चाकी, व 6 चाकी जड वाहन चालकांना  वाहन चालविण्याचे  परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येईल.  तसेच वाहन चालकांना रिफ्रेशर कोर्स सुद्धा  करता येणार आहे. यामध्ये वाहन चालकाची संगणकीकृत  चाचणी घेण्यात येईल. प्रत्यक्ष वाहन चालवतांना मध्येच एखादी व्यक्ती, वाहन, जनावर आल्यास वाहनचालक त्या परिस्थितीला कसा हाताळतो हे सुध्दा या चाचणीत तपासले जाईल. तसेच अपघाताच्या वेळी त्याचे मानसिक, शारीरिक संतुलन याचा सुद्धा अभ्यास केला जाईल.  या चाचण्यांमध्ये अयशस्वी झालेल्या वाहनचालकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल.
या प्रशिक्षण केंद्रातील  अभ्यासक्रम हा 30 दिवसांचा राहणार आहे. यामध्ये  वाहन चालकाची वर्तणूक , व्यवहार आणि ताण व्यवस्थापन , बचावात्मक चालक तंत्र, वाहतुकीचे नियम आणि कायदे,  आणीबाणीची परिस्थिती  हाताळण्याचे तंत्र, वाहन देखभाल व इंधन संवर्धन, प्रदूषण आणि पर्यावरण, अपघात घटना, अपघात कारणाचे विश्लेषण, कुणाचा दोष होता आणि ते कसे टाळता आले असते, वारंवार अपघात घडलेल्या वाहनचालकांसाठी सुरक्षितता यावर प्रशिक्षण इत्यादी बाबींचा समावेश येथील अभ्यासक्रमात राहणार आहे.
वाहनचालकांचे प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी आणि वर्तणूक विश्लेषण चाचणी घेण्यात येईल. या केंद्रात प्रशिक्षणार्थींची राहणे- आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असणार आहे. तसेच वाहनचालकाची चाचणी घेण्यासाठी ट्रॅक सुद्धा असणार आहे.

No comments:

Post a Comment