Thursday 25 October 2018


20 हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी देणार
                                         -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• 28 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
• 80 जागांसाठी वायफाय सुविधा सुरू
         वर्धा दि 25 (जिमाका):- प्रत्येक गावात घरोघरी पिण्याचे  शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. 15 वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र  शासनाने 8 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील 20 हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
         मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पिपरी मेघे व 13 गावे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सावंगी मेघे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे,  दत्ता मेघे, सावंगी मेघे ग्रामपंचायत सरपंच सरिता दौड आदी उपस्थित होते.
        देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यात 60 लाख नवीन शौचालये बांधण्यात आलीत हे सांगताना  मुख्यमंत्री म्हणाले,   हागणदारी मुक्त महाराष्ट्र आणि शुद्ध पाणी पुरवठा  करण्यात शासनाला यश मिळाले. या दोन्ही बाबतीत राज्य  देशात प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी त्यांनी मंत्री बबनराव लोणीकर यांचे अभिनंदन व कौतुक केले.
आमदार पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.यापुढे आदिवासी बांधवाचे  नागपूर कार्यालयात जाण्याचे कष्ट कमी होतील असेही श्री फडणवीस म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पत पुरवठा करण्यासाठी वर्धा जिल्हा सहकारी बँकेला राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण  करण्याचा निर्णय शासनाने  घेतला आहे. लवकरच बँकेची व्यवस्था सुरळीत सुरू होऊन  सामान्य जनतेच्या हक्काची बँक सेवेत दाखल  होईल असे श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 
         बबनराव लोणीकर यावेळी बोलताना म्हणाले,  पाणी पुरवठा विभाग दुर्लक्षित  होता. 14 - 15 हजार पाणी पुरवठा योजना अपूर्ण होत्या. यासाठी नितीन गडकरी यांचे माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि 5 हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. यातून 5 हजार 600 गावांच्या योजना पूर्ण केल्यात. उर्वरित गावांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरू करून मुख्यमंत्र्यांनी 2 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्यामुळे केंद्र शासनाने 8 हजार कोटी रुपयांच्या आरखडयास मान्यता दिली. तसेच शासनाने जागतिक बँकेचे 1300 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन संपूर्ण राज्यात शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत असे श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
आमदार पंकज भोयर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डिजिटल इंडिया अंतर्गत 80 जागांसाठी वायफाय सुविधेचे  लोकार्पण करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
                                                          00000















No comments:

Post a Comment