Friday 3 September 2021

 



जल जीवन मिशन अंतर्गत 442 योजनांची

कामांची निविदा प्रक्रिया  सप्टेंबर अखेरीस पूर्ण करा

                                 -जिल्हाधिकारी

वर्धा, दि 3 सप्टेंबर,(जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी व नविन पाणी पुरवठा अशा ४४२ योजनांची अंदाजपत्रके तयार करावयाची असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रके तयार करण्याच्या कामाची गती वाढवावी. सप्टेंबर अखेर योजनांची अंदाजपत्रके प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेत.

         जल जीवन मिशन अंतर्गत "जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन बाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी

          डॉ. सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री. मदनकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील रहाने, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे श्री. कुळकणी, वरीष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, विद्युत वितरण कंपनीचे श्री. पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

        जिल्ह्यात प्रती माणसी प्रती दिवस 55 लिटर पाणी देण्यासाठी  425 गावांमध्ये असलेल्या जुन्या योजनांची क्षमता वृद्धी करण्यासाठी 393 योजनांची कामे करायची आहेत. तसेच 68 गावांमध्ये 49 नवीन योजनांची कामे सुरू करण्यासाठी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास गती देण्यास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व अंदाजपत्रके एक आठवड्यात तयार करून त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

पाणी पुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जेवर आधारितनेट मिटरिंगचा अवलंब करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून  मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश दिलेत.

         तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित नविन पाणी पुरवठा योजनेचे कामांकरिता कुशल व अनुभवी कंत्राटदारांकडून सदर काम करून घेण्यासोबतच  केलेल्या  कामाची गुणवत्ता तपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी  काम पूर्णत्वाचा अहवाल द्यावा अशी सूचना ग्रामीण पाणी पुरवठा

कार्यकारी अभियंता यांनी केली. यासाठी  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांचेकडे सदर कामाचे पर्यवेक्षण शुल्काचा भरणा केल्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणकडून सदर कामावर पर्यवेक्षण करण्यात येईल व काम पूर्णत्वाचा अहवाल सादर करता येईल असे सांगितले. 

                                                   000000

No comments:

Post a Comment