Friday 13 August 2021

 

आता  शेतक-यांना स्वतःच घेता येणार आपल्या पिकाची नोंद

 

ई -पीक पाहणी अँप लॉन्च

 

     वर्धा, दि 13 (जिमाका):- येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. शेतकऱ्यांना आता स्वतःच मोबाईल अँपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद सातबारा मध्ये घेता येणार असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचण्यासोबतच चुकीच्या नोंदीमुळे होणारे नुकसान टळणार आहे.

टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता.  मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत आहे. 

 आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.

 माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा" असे या प्रकल्पाचे बोधवाक्य आहे.

शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.

 

0000

 

No comments:

Post a Comment