Thursday 26 August 2021

 


 

जल जीवन मिशनमधून प्रस्तावित पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचे नियोजन करावे

                                                                                     -जिल्हाधिकारी

      वर्धा, दि 26 ऑगस्ट (जिमाका):-  अनेकदा ग्रामीण पुरवठा योजनांचे वीज देयक न भरल्यामुळे त्या गावांचा  पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे यापुढे किमान वीज बील भरण्याच्या त्रासातून ग्रामपंचायतची सुटका होऊन गावातील लोकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी

नवीन पाणी पुरवठा योजना किंवा जुन्या पाणी पुरवठा योजना बळकट करताना त्या सौर ऊर्जेवर चालतील असेच नियोजन करण्याचा सूचना जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

जल जीवन मिशन कार्यक्रमाबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी त्यांनी सदर सूचना केल्यात. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग डी एस वाघ, मजीप्रा कार्यकारी अभियंता श्री चंद्रिकापुरे, वर्धा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुनील रहाणे, शिक्षणाधिकारी संजय मेहेर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदी अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांवर पूर्वी कोणत्या योजनेतून, कोणकोणत्या बाबीवर खर्च झालेला आहे याची माहिती देण्यात यावी. तसेच 2036 मधील लोकसंख्या गृहीत धरून प्रति माणसी 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत, त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

ग्रामपंचायती सोबतच अंगणवाड्या, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी 100 टक्के नळ जोडणी देण्याचे नियोजन करावे.

यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत समुद्रपूर मधील कांढळी, आरंभा, फुकटा, बांबरडा, तसेच वर्धा येथील मोर्चापुर, बोथली, आमगाव जंगली या 7 गावांचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी त्यामध्ये सुधारणा सुचवून तो  पुढील आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्यात. 

तसेच मजीप्राच्या सेवाग्राम व 5 गावे आणि पिपरी मेघे आणि 13 गावांच्या पाणी पुरवठा योजनेवर चर्चा करण्यात आली. मोठ्या योजनेसाठी निधी लवकर मिळणे आणि काम वेळेत पूर्ण करणे याबाबीसाठी खूप वेळ जातो. त्यामुळे यापुढे शक्यतो मोठ्या योजना घेण्यापेक्षा  प्रत्येक ग्रामपंचायत निहायच योजना प्रस्तावित करण्यात यावी. जेणेकरून  योजना लवकर पूर्ण होऊन गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment