Friday 20 January 2012

साद ही वसुंधरेची .. !

बाजारपेठ आणि खुली अर्थव्‍यवस्‍था आल्‍यानंतर भौतिकवाद व स्‍वामित्‍वाच्‍या भावनेतून गेल्‍या दशकात वाहन संख्‍या प्रचंड वाढली. परिणामी प्रदूषण आणि पर्यावरण अशी संकटांची मालिका उभी राहिली. या समस्‍येतून अनेक समस्‍यांची रांगच आता समोर आली आहे. याबाबत हा आढावा.
      -प्रशांत दैठणकर

      गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्रदूषणाचे वाढते प्रमाण आपल्‍यासाठी चिंतेचा विषय बनलाय. दिसवसेंदिवस जगाची लोकसंख्‍या वाढत आहे. या लोकसंख्‍येच्‍या गरजेनुसार ज्‍यावेळी संसाधनांचा वापर सुरु झाला त्‍याचवेळी पर्यावरणाची हानी आणि प्रदूषणात वाढ अशी दुहेरी समस्‍या निर्माण झाली. यात सर्वच प्रकारच्‍या प्रदूषणाचा आपल्‍या सर्वांच्‍या जगण्‍यावर होत असून, पर्यावरणाची हानी देखील प्रचंड अशीच आहे.

सध्‍या शहरांमधून ध्‍वनी आणि वायू प्रदूषणाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. बाजारपेठ अर्थव्‍यवस्‍था आपण स्‍वीकारली त्‍यानंतर त्‍याच्‍या दुष्‍परिणामांपैकी एक अर्थात मूबलक पैसा. या मूबलक पैसा आणि विक्रीच्‍या स्‍पर्धेत वाहन कंपन्‍यांनी मानवी मनातील स्‍वामित्‍वाच्‍या भावनेला साद घाल आपली उत्‍पादनं विकली. त्‍यात माझं स्‍वतःचं, व्‍यक्‍तीगत वाहन घेण्‍याची हौस आणि त्‍याच प्रमाणात होणारा आर्थिक पुरवठा यामुळे वाहन संख्‍येत गेल्‍या 15-20 वर्षांमध्‍ये झपाट्याने वाढ झाली.

या वाढत्‍या वाहनसंख्‍येच्‍या समस्‍येने एका नव्‍याच समस्‍यांच्‍या मालिकेला जन्‍म दिला. यात पहिले पेट्रोल आणि डिझेल यांचे मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. ज्‍याचा दरवाढ होण्‍यावर तर परिणाम झालाच सोबतच महागाई वाढण्‍यास ही दरवाढ कारणीभूत ठरली. याचा सर्वच भारतीयांच्‍या जीवनावर परिणाम झालेला दिसतो.

दुस-या बाजूला या वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने पर्यावरणाचे संकट निर्माण केले. पेट्रोल-डिझेल हे जीवाश्‍य इंधन आहे. त्‍याचे साठे संपण्‍याचा धोका वाढला. इंधन वहन करुन नेणारी जहाज समुद्रात कलंडून समुद्री जीवसृष्‍टी आणि समुद्री पर्यावरण यालाही धोका सुरु झाला.

या वाहन संख्‍येचा आणखी आणि सर्वात मोठा तोटा अर्थातच प्रदूषण. वाहने ध्‍वनी तसेच वायू प्रदूषणात भर पाडत आहे. वाहनातून इंधनाचे ज्‍वलन होवून जे घातक वायू बाहेर पडतात त्‍यात कार्बन मोनोक्‍साईड मानवी शरीराला हानीकारक आहे. याने श्‍वसन संबंधित विकारांमध्‍ये गेलया दशकात वाढ झाली. त्‍यासोबत आपणाला ध्‍वनी प्रदूषणाचा त्रास देखील खूप वाढलेला जाणवतो. हमरस्‍त्‍यालगत घर असणे पूर्वी मानाचं होतं पण या प्रदुषणामुळे ते ताणाचं बनलय.


आपणास ध्‍वनीप्रदूषणाचा व वायूप्रदूषणाचा जितका त्रास होतो. त्‍याही पेक्षा अधिक त्रास नव्‍या पिढीला, लहान बालकांना आणि रुग्‍ण व्‍यक्‍तींना होतो . वाहनातून वायू उत्‍सर्जन किती असावा याची मानकं शासनानं ठरवली पण त्‍याला न जुमानण्‍याची वृत्‍ती सर्वांच्‍या ठायी आहे परिणामी ही समस्‍या वाढतच आहे.

सततच्‍या वाहतूकीने शहरी भागात ऑक्‍सीजनचे प्रमाण घटलेले आहे. याचा परिणाम रोग प्रतिकारशक्‍ती कमी होण्‍यावर देखील होतो. पर्यावरणाच्‍या नावाने एखादा दिवस नो व्‍हेईकल डे करणा-या मंडळींना या समस्‍येचे गांभीर्य जाणून अधिक सजगपणे कृती करावी लागेल ही धरा, वसुंधरा सुंदर राखायला इतकं आपण करायलाच हवं.
                                                  प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment