Thursday 19 January 2012

मुलींना द्या आत्मसंरक्षणाचे शिक्षण.. !



  महिलांची व मुलींची छेडछाड करणारे अनेक चिडीमार समाजात वावरताना दिसतात. मुलींना समाजात सुरक्षितपणानं रहायला समाज सुसंस्कृत होणं जितकं गरजेचं आहे तितकीच सिध्दता महिलांनीही करुन आत्मसंरक्षण शिकलं पाहिजे.                                                -प्रशांत दैठणकर
    
     आपण वर्तमानपत्र उघडल्यावर रोज महिलांवर अत्याचार आणि मुलीची छेडछाड झाल्याच्या बातम्या वाचतो अद्यापही समाज पूर्णपणे सुसंस्कृत झालेला नाही गुन्हेगारी वृत्तीने फिरणा-या संकटांमुळे महिला व मुलींना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो. यात बदल व्हावा यासाठी समाज या नात्याने आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच समाज सुधारेल या अपेक्षेवर न राहता महिला व मुलींनी आत्मसंरक्षण तंत्र शिकलेच पाहिजे.
     आपण आपल्या संरक्षणासाठी सज्ज राहणं खूपच चांगलं अनेक प्रकारात भितीपोटी मुली बोलत नाहीत. शाळेतील विद्यर्थी किंवा शाळेतून जाताना-येताना कुणी त्रास देत असेल तर ते मुलींनी पालकांना जरुर सांगावे. समस्या निर्माण झाल्यावर त्वरित उपाय योजना केल्यास पुढे मोठी होणारे संकट आपण टाळू शकतो.
     अनेक ठिकाणी शाळांमधून शिक्षक मुलीची छेड काढतात अशा घटना घडल्या आहेत. आपण आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला तरच पाल्य अशा गोष्टी आपणास सांगतील याची जाणीव आपण ठेवावी.
     वयात येणा-या अर्थात किशोरवयीन मुलींना अनेक समस्यांना एका वेळी सामोरं जावं लागतं. या काळात ज्युदो, कराटे, किंवा ताइक्वोंदो अशापैकी एक मार्शल आर्ट शिकविल्यास त्यांना स्वत:चे रक्षण करता येईल या प्रकारच्या आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण आपण जबाबदारीने जरुर द्यावे. शाळांनीही अशा प्राकरचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
     महिलांनी सुरक्षेसाठी आपल्या पर्स मध्ये काळया मि-यांची पावडर ठेवण्याची पध्दत पाश्चात देशात आहे. अशा पावडरचे स्प्रे बाजारात उपलब्ध असतात बहुतप्रसंगी संकटात या स्प्रेचा वापर होतो असं अनेकदा सिध्द झालेलं असल्याने तसा सुरक्षेचा उपाय जरुर करावा.
     महिलांवर केवळ छेडखानी अर्थात चिडीमारीसाठी हल्ला होतो असे नाही. झटपट श्रीमंत होण्याच्या नादापायी दागिने पळविणारे गुन्हेगार देखील हल्ला करतात. सार्वजनिक ठिकाणी आपल्या सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करु नका असा कितीही सल्ला दिला तरी महिलावर्गाला दागिन्यांची आवड असते त्यामुळे मोठया प्रमाणावर चेन स्नॅचिंग चे प्रकार हल्ली घडताना दिसतात तो दागिना महत्वाचा की आपण महत्वाचे याचाही विचार महिलांनी जरुर करावा.
     मोठं महानगर असो अथवा छोटं खेडं, प्रत्येक ठिकाणी ही समस्या कायम दिसते. त्यामुळे मुली व महिलांनी आत्मसंरक्षण जरुर जरुर शिकावं
   -प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment