Friday 20 January 2012

25 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस

वर्धा,दि.20- भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2012 हा दिवस राष्‍ट्रीय मतदार दिवस म्‍हणून साजरा करण्‍याचे निश्‍चीत केले आहे. त्‍यानुसार येत्‍या 25 जानेवारीला प्रत्‍येक मतदान केंद्राच्‍या ठिकाणी राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे.

सदर कार्यक्रम मध्‍यवर्ती मतदान केंद्राच्‍या ठिकाणी किंवा परिसरातील शाळा, महाविद्यालय, समाज मंदीर, सार्वजनिक सभागृह आदीमध्‍ये आयोजित केला जाणार आहे. त्‍यात नव्‍याने नोंदणी झालेले सर्व नवीन मतदार, त्‍यांचे पालक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, कार्यकर्ते, स्‍थानिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, प्राध्‍यापक, शिक्षक व कर्मचारी, त्‍या भागातील नागरीक यांना निमंत्रित केले जाणार आहे.


यात नव्‍याने नोंदणी करण्‍यात आलेल्‍या मतदारांना आमंत्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्व उपस्थित नवीन मतदारांना प्रतिज्ञा दिली जाणार आहे. नवीन मतदारांना याच कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र व बिल्‍ले वाटप केले जाणार आहे. मतदार नाव नोंदणी व मतदान याविषयी उपस्थित मान्‍यवरांव्‍दारे मार्गदर्शन केले जाणार आहे. मतदारांना मतदार यादीचे भाग या ठिकाणी दाखविले जातील.

 जनजागृतीकरीता महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्‍ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी, स्‍वयंसेवी संस्‍था आदींची प्रभातफेरी, दौड, सायकल रॅली अशा कार्यक्रमाचे आयोजन आठवडाभर केले जाणार आहे. पथनाट्य, लोककला, लोकनृत्‍य इत्‍यादी कार्यक्रमाव्‍दारे ही मोहीम यशस्‍वी करण्‍याचे प्रयत्‍न शासन व निवडणूक विभागाव्‍दारे सुरु झाले आहे.
 स्‍वातंत्र्यानंतर दुस-यांदा प्रत्येक मतदान केंद्रावर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करुन मतदारांना व नवीन मतदारांना लोकशाही प्रक्रियेतील त्‍यांच्‍या सहभागाबद्दल, जबाबदारीची जाणीव करुन देण्‍याचा हा प्रयत्‍न राहणार आहे. असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी, वर्धा कळवितात.

No comments:

Post a Comment