Friday 20 January 2012

वाहनांची वाढ आणि विकासाला खीळ .. !


वाढलेली वाहनसंख्‍या पर्यावरणाचे संकट निर्माण करणारी नसून, त्‍याचा परिणाम अपघातांमधील प्राणहानी व वित्‍तहानी पर्यंत वाढलाय. पार्किंग आणि अपू-या रस्‍त्‍यांची समस्‍या निर्माण झालेली आपणास दिसते. यासोबत इंधनापोटी मोठया प्रमाणावर विदेशी चलन खर्च करावे लागते. या सर्वांचा एकत्रित परिणाम विकास प्रक्रियेवर होत असल्‍याने याबाबत जागरुक होण्‍याची वेळ आता आली आहे.
               -प्रशांत दैठणकर


    गेल्‍या 2 दशकांमध्‍ये वाहन संख्‍या वाढल्‍याने विविध समस्‍यांची एक साखळीच समोर आली आहे. यात जितका मोठा धोका पर्यावरणाला आहे तितकाच मानवी आयुष्‍याला आहे. वाहनांमुळे होणारे अपघात त्‍यात होणारी प्राणहानी तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी वित्‍तहानी यासोबत जागेच्‍या टंचाईची अर्थात पार्कींगची समस्‍या देखील या वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने निर्माण झाली आहे.

वाहन संख्‍येत होणारी ही वाढ इतकी प्रचंड आहे की, त्‍यामुळे जागा कमी पडायला लागली आहे. कधी काळी मोकळे-मोकळे असणारे रस्‍ते आता मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण करुन चार व सहापदरी केले तरी अल्‍पावधीत ते रस्‍ते देखील वाहतुकीने ओव्‍हर-फ्लो होत असल्‍याचं चित्र आहे.

रस्‍त्‍यांवर होणारे पार्कींग ही शहरी भागातली मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनांसाठी पार्किंग हवे म्‍हणून घरांच्‍या बांधकामाची पध्‍दत बदलून गेली. याचा परिणाम मुलांना खेळायला देखील जागा न मिळणे, पादचा-यांना रस्‍त्‍यावरुनच चालावे लागणे आदी प्रकार दिसत आहेत. अपरिहार्य व्‍यवस्‍था म्‍हणून आता महानगरांमधून खास पार्कींगसाठी इमारती बांधण्‍याची वेळ आली आहे.

वाढलेल्‍या वाहन संख्‍येचा आणखी एक तोटा म्‍हणजे वाहतुकीची होणारी कोंडी वाहनांच्‍या गर्दीत आपलेच वाहन पुढे दामटण्‍याचा प्रयत्‍न प्रत्‍येकजण करताना दिसतो. महानगरात सिग्‍नलवर संथपणे रांगणा-या कारच्‍या रांगांचे चित्र नवे नाही. 2008 साली चीन ऑलिम्पिकच्‍या वेळी वाहनांच्‍या कोंडीमुळे हजारो वाहन धारकांना तब्‍बल 28 तासांपर्यंत वाहनात अडकून रहावे लागले होते. या प्रकारे लाखो-करोडे मनुष्‍य तास केवळ वाहतुकीच्‍या कोंडीमुळे आपल्‍याही देशात वाया जाताना दिसतात.


वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने आणखी वाढ झाली ती रस्‍त्‍यांवर होणा-या अपघातांमध्‍ये गेल्‍या वर्षभरात रस्‍ते अपघातात दीड लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आणि दरवर्षी ही संख्‍या वाढतेय. सोबत जे अपघातात जखमी होतात आणि अपंग होतात त्‍यांचे आयुष्‍य देखील उर्वरित काळ संकटच बनलेले दिसते. वाहनांच्‍या अपघातात प्राणहानी सोबतच मोठ्या प्रमाणावर वित्‍त हानी देखील होते. ही वाहने अपघातात नष्‍ट झाल्‍याने देखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो.

     भारतात वाढलेल्‍या वाहनसंख्‍येचा परिणाम विदेशी मुद्रेवर देखील झालेला आहे. आपण जे क्रूड तेल वापरतो त्‍या तेलाच्‍या बाबतीत आपला देश स्‍वयंपूर्ण नाही. यामुळे मुल्‍यवान विदेशी मुद्रा खर्च करुन आपण ते खरेदी करीत असतो. लोकसंख्‍या वाढीइतकीच वाहन संख्‍या वाढीची ही समस्‍या गंभीर आहे.

    छोट्या गावांमध्‍ये आणि नगरांमध्‍ये वाहनवृध्‍दीचा ताण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांवर झालेला आहे. अपुरे रस्‍ते ही समस्‍या तर आहेच सोबतच वाहनाचे अवागमन वाढलयाने जून्‍या पध्‍दतीच्‍या पध्‍दतीच्‍या रस्‍तयांवर प्रचंड खड्डे पडलेले दिसतात. या रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीपायी इतर सुविधांचा पैसा खर्च होतो परिणामी विकासाची गती कमी होवुन जाते.

     रस्‍त्‍यांची भारवहन क्षमता आणि एकूणच उपलब्‍धता यामुळे आता रस्‍त्‍यांवरुन जाण्‍यासाठी टोल देण्‍याची पाळी ही याच वाढलेल्‍या वाहन संख्‍येमुळेच आलीय. याला कितपत चालना द्यायची की यावर नियंत्रण हवे यावर चर्चा होणे ही आता काळाची गरज झाली आहे.

- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment