Thursday 19 January 2012

हत्तीरोग दूर राखणंच चांगलं.. !

डासांमुळे प्रसार होतो अशा रोगांपैकी एक रोग म्हणजे हत्तीरोग होय. या रोगांमुळे प्राण जात नसले तरी मोठया प्रमाणावर विद्रुपता येत असते. जगातील 12 कोटींहून अधिक जणांना हा रोग झालेला आहे. हत्तीरोग दूरीकरण मोहिमे अंतर्गत जानेवारीच्या तिस-या आठवडयात राज्याच्या 17 जिल्ह्यांमध्ये एक दिवसाच्या सामुहिक औषधोपचार दिवस आयोजित करण्यात येतो याबाबत हा खास लेख
 -प्रशांत दैठणकर


डासांमुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार होतात. डास हे रक्त शोषून घेतात. त्यांच्या दंशाच्यावेळी त्यांच्या पोकळ दंशिकेमुळे रागांचे विषाणू थेट रक्तात शिरत असल्यामुळे डासांना दूर ठेवणे गरजेचे आहे. डास ज्या आजारांचा प्रसार करतात मलेरिया अर्थात हिवतापाचे प्रमाण अधिक आहे. या खेरीज डेंग्यू सारखा घातक आजार देखील डासांमुळे होतो. हे दोन्ही आजार प्राणघातक ठरु शकतात. तुलनेत कमी तीव्रतेचा पण शरीराला बेढव करणारा हत्ती रोगासारखा आजारही डासांमुळे पसरतो.
     अगदी पाचव्या शतकापासून हत्तीरोग झाल्याच्या नोंदी आपणास सापडतील या रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होत असतो. जगात हत्तीरोगाची तब्बल 12 कोटीहून अधिक जणांना लागण झाली आहे. साठलेले, तुंबलेले पाणी तसेच ढुबके यातून या क्युलेक्स डासांची संख्या वाढत असते.
     पाय खूप मोठया प्रमाणात सुजणे, वारंवार ताप येणे, पुरळ, खाज आणि अंडवृध्दी ही या हत्तीरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराने मोठया प्रमाणात विकृती येते त्यामुळे याचा प्रतिबंध करण्यासाठी हत्तीरोग दूरीकरण मोहिमेत आपल्याला देण्यात येणा-या औषधी सर्वच नागरिकांनी घेणे आवश्यक ठरते.
     या अंतर्गत राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवडयात सामुदायिक औषधी दिन आयोजित करण्यात येत असतो यात रोगाची गांभीर्य लक्षात घेऊन या मोहिमेत लहान मोठया सर्वानीच या औषधीचे सेवन करायचे आहे. यात जंत साफ करणारी एक अल्बेन्डाझोलची गोळी आणि डिईसीच्या गोळया सर्वांना दिल्या जातात या गोळया घेतल्यानंतर हत्तीरोगाप्रती प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते.
     आपण प्रतिबंधात्मक उपाय केल्यास या रोगातून येणारे शरिरीक व्यंग आपणास टाळता येईल त्याच सोबत पुढे उपचारांवर वेळ आणि खर्च वाचवता येईल. या खेरिज डासांपासून होणारे आजार टाळण्यासाठी आपण सातत्याने परिसर स्वच्छतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे.
- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment