Saturday 1 September 2012

विविध योजनांचा लाभासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडा जिल्‍हाधिका-यांचे जनतेला आवाहन



      *  2 ऑक्‍टोंबर पर्यंत सर्व लाभधारकांचे बँकेत खाते
      *  1382 गावांमध्‍ये बँक खाते उघडण्‍यासाठी विशेष मोहिम
      *  संजय गांधी,श्रावण बाळ, केरोसीन,स्‍कॉलरशीप बँकेमार्फतच
      
          वर्धा,दि.1- शासनाच्‍या विविध योजनांच्‍या  लाभ  तसेच अनुदान यापुढे लाभधारकांच्‍या राष्‍ट्रीयकृत बँकेतील खात्‍यातच  जमा करण्‍यात येणार असल्‍यामुळे जिल्‍ह्यातील सर्व लाभधारकांनी  आपले बँक खाते गावातील राष्‍ट्रीयकृत बँकेत तात्‍काळ सुरु करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी  केले आहे.
          जिल्‍ह्यातील 18 वर्षे  पूर्ण झालेल्‍या सर्व  नागरिकांनी  आपले खाते बँकेत सुरु करण्‍याचे आवाहनही  जिल्‍हाधिका-यांनी  केले आहे. बँकेत खाते उघडण्‍यासाठी  जिल्‍ह्यातील सर्व  राष्‍ट्रीयकृत  व  वाणिज्‍य  बँकांना  सुचना देण्‍यात आल्‍या  आहेत.
          शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ तसेच स्‍कॉलरशीप, केरोसीन अनुदान यापुढे बँकेमार्फतच वितरीत करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असल्‍यामुळे  जिल्‍ह्यातील  सर्व  लाभधारकांनी  बँक खाते 2 ऑक्‍टोंबर पर्यंत उघडण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत सर्व राष्‍ट्रीयकृत बँकांना सुचना देण्‍यात आल्‍या असून, त्‍यानुसार  बँकेत खाते उघडण्‍यासाठी बँकामार्फत विशेष सुविधा सुरु करण्‍यात आली असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी दिली.
        राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्‍यासाठी   लाभधारकांचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो , रहिवास प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे), निवडणूक व आधारकार्डच्‍या झेरॉक्‍स आवश्‍यक आहे. राष्‍ट्रीयकृत व वाणीज्‍य बँकेत खाते उघडण्‍यासाठी अंगणवाडी सेविका तसेच आशा  सेविका  प्रत्‍येक गावात मदतनीस म्‍हणून कार्य करणार आहेत. बँकेत खाते उघडण्‍यासाठी जिल्‍ह्यातील सर्व बँकांना सुचना देण्‍यात आल्‍या असून खाते उघडण्‍यासाठी  कुठलीही रक्‍कम जमा करण्‍याची  आवश्‍यकता नसून (शून्‍य बॅलन्‍स ) आधारीत बँकेत खाते उघडण्‍यात येणार आहे.
         शासकीय योजनांचा संपूर्ण लाभ बँकेमार्फतच देण्‍याची  योजना  राज्‍यातील सहा जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणार असून, यामध्‍ये वर्ध्‍यासह  अमरावती, नंदूरबार, पुणे, मुंबई शहर व उपनगर यांचा समावेश आहे. लाभधारकांचे बचत खाते  आधारकार्डाशी  संलग्‍न  राहणार आहे.
                              रविवारी प्रशिक्षण
         जिल्‍ह्यातील सर्व  योजनांच्‍या लाभासाठी  बँकखाते उघडण्‍याबाबत रविवार दिनांक 2 सप्‍टेंबर 2012 रोजी सकाळी 11 वाजता विकासभवन येथे सर्व राष्‍ट्रीयकृत बँकाचे  अधिकारी, सर्व महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी व संबधित  अधिका-यांची  कार्यशाळा  आयोजीत करण्‍यात आली आहे.  या कार्यशाळेमध्‍ये बँकेत खाते उघडण्‍यासंबधी  मार्गदर्शन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.  
                                                0000

No comments:

Post a Comment