Tuesday 28 August 2012

जलजन्‍य व साथीचे आजार टाळण्‍यासाठी निर्जंतुक केलेल्‍याच पाण्‍याचा वापर करा- डॉ. दिलीप माने


      वर्धा,दि. 28- पावसामुळे नदी नाले तलाव व विहरींना नवीन पाणी आल्‍यामुळे जलजन्‍य आजारासोबतच साथीचे आजार उदभवण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे जनतेनी पिण्‍याचे पाणी निर्जंतु करुनच पिण्‍यासाठी पाणी वापरावे असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.
        पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्‍याचे पाणी निर्जंतकीकरण न झाल्‍यामुळे साथीचे आजाराचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता अधिक असल्‍यामुळे अतिसार, गॅस्‍ट्रो, कावीळ, टायफाईड हे आजार होण्‍याची शक्‍यता राहते. या आजाराच्‍या रुग्‍णांवर योग्‍यवेळी उपचार होणे आवश्‍यक  असते. यासाठी जिल्‍ह्यातील सर्व आरोग्‍य केंद्रात आवश्‍यक औषधी पुरवठा करुन देण्‍यात आला आहे. साथीचे रोग टाळण्‍यासाठी निर्जंतूक केलेले अथवा पाणी उकळूनच प्‍यावे असे आवाहनही जिल्‍हा परिषदेतर्फे जनतेला करण्‍यात आले आहे.
     उघड्यावरचे अन्‍न खाणे, शिळे अन्‍न खाणे, दुषित फळे खाणे, जेवणापुर्वी  व स्‍वयंपाक करण्‍यापूर्वी तसेच शौचावरुन आल्‍यानंतर हात साबणाने स्‍वच्‍छ न धुणे यामुळे देखिल साथीचे आजार पसरण्‍याची शक्‍यता असते. तेव्‍हा वैयक्तिक स्‍वच्‍छतेकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.
      गावातील  अस्‍वच्‍छता , तुंबलेल्‍या नाल्‍या व घाणीचे साम्राज्‍य  व शेणखताचे उकीरडे त्‍यामुळे परिसरात डासाची पैदास मोठ्या प्रमाणात होवून हिवताप व मेंदूज्‍वर इत्‍यादी आजाराची लागण होण्‍याची शक्‍यता असते. या आजारावर नियंत्रण मिळविण्‍याकरीता डास निर्मितीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. त्‍याकरीता गांव स्‍वच्‍छ ठेवणे, गावातील तुंबलेल्‍या नाल्‍या वाहत्‍या करणे, उकीरडे गावाच्‍या बाहेर बनविणे हे फारच महत्‍वाचे आहे. याशिवाय तापाची किंवा इतर साथीचे आजाराची लागण झाल्‍यास नजीकच्‍या आरोग्‍य उपकेंद्रात,प्राथमिक आरोग्‍य केंद्रात, ग्रामीण रुग्‍णालय, उपजिल्‍हा रुग्‍णालय यांचेशी संपर्क साधून योग्‍य निदान व उपचार करुन घ्‍यावे.
      तसेच मागील महिन्‍यात नागव्‍दार येथे यात्रेकरीता गेलेल्‍या यात्रेकरुंना आवाहन करण्‍यात येते की, नजीकच्‍या आरोग्‍य केंद्रात जावून आपल्‍या रक्‍ताची तपासणी करुन घ्‍यावी व प्रतिबंधात्‍मक उपचार करुन घ्‍यावा. तसेच आरोग्‍य कर्मचारी आपले घरी सर्व्‍हेक्षण करण्‍याकरीता आल्‍यास त्‍यांना सहकार्य करुन त्‍यांनी दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. असे आवाहन डॉ. दिलीप माने यांनी केले.
                                                0000000

No comments:

Post a Comment