Friday 31 August 2012

सोयाबीन व कापूस पिकावरील किड अळीवर तात्‍काळ उपाययोजना करा - राजेन्‍द्र मुळक


कृषी विभागाच्‍या भिंतीपत्रकाचे प्रकाशन

वर्धा,दि.30 – सोयाबीन व कापूस पिकांवर पाने खाणा-या अळ्यांचा तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे पिकांच्‍या संरक्षणासाठी तात्‍काळ उपाययोजना करा अशा सुचना राज्‍याचे पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांनी आज दिल्‍यात.
      विश्रामगृह येथील सभागृहात कृ‍षी विभागातर्फे शेतक-यांच्‍या मार्गदर्शनासाठी सोयाबीन पीकावरील पाने खाणा-या अळ्यांच्‍या नियंत्रणाबाबत तयार करण्‍यात आलेल्‍या भिंतीपत्रकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
       यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वरराव ढगे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
     जिल्‍ह्यात पिकावरील किड रोग सर्व्‍हेक्षण व शेतक-यांना सल्‍ला देण्‍यासाठी क्रापसॅप हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत असून, यासाठी किड नियंत्रक व सर्व्‍हेक्षकांची नियुक्‍त करण्‍यात आली आहे. कापूस, सोयाबीन व तूर पिकावरील किडींबाबत जिल्‍ह्यातील 56 प्रकल्‍पाव्‍दारे सर्व्‍हेक्षण करुन किड रोगाच्‍या नियंत्रणाकरीता शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यात येत असल्‍याची माहितीही  पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
                                        ... 2....




 सोयाबीन व कापूस पिकावरील ... 2....

      जिल्‍ह्यात सोयाबीन पिकावर केसाळ अळी, चक्रभुंगा अळी, उंटअळी तसेच तंबाखूचा पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव काही भागात असल्‍यामुळे शेतक-यांनीही कृषी विभागातर्फे अनुदानावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या औषधाची फवारणी करावी तसेच शेतातील पीक संरक्षीत राहील याची खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन करताना जिल्‍हा व कृ‍षी अधिका-यांनी ज्‍या गावांमध्‍ये किड रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा गावांमध्‍ये भेट देऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावे अशा सुचनाही पालकमंत्री राजेंन्‍द्र मुळक यांनी केल्‍या.
      किड रोगाच्‍या नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात जैवीक किटकनाशकांची तसेच इतर औषधांची उपलब्‍धता करुन देण्‍यात आली असून, शेतक-यांना अनुदानावर औषधे उपलब्‍ध आहेत. तालुका कृषी अधिका-यांकडे मागणी केल्‍यास बिव्‍हेरीया, बॅसीयाना, या जैवीक किटकनाशकांची मागणी तातडीने  नोंदविल्‍यास तात्‍काळ औषधे उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
             एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
    मागील आठवड्यात झालेल्‍या पावसामुळे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील लालनाला व पोथरा या नदीचे पाणी तसेच इतर नाल्‍यांच्‍या पुरामुळे  1 हजार 61 क्षेत्रावरील कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.
     हिंगणघाट तालुक्‍यातील आठ गावातील 591 शेतक-यांच्‍या शेतातील कापूस व सोयाबीन तसेच समुद्रपूर तालुक्‍यातील 8 गावातील 322 बाधीत शेतक-यांच्‍या शेतातील कापूस, सोयाबीन व तूर अशा दोन्‍ही तालुक्‍यातील 913 बाधीत शेतक-यांच्‍या शेतातील 1 हजार 061 हेक्‍टर क्षेत्रातील  50 टक्‍केच्‍या वर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 158 हेक्‍टर क्षेत्रातील 50 टक्‍केच्‍या आंत शेतपिकाचे नुकसान झाले असल्‍याची माहिती यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.
                        000000
          

No comments:

Post a Comment