Tuesday 2 February 2016

गावासाठी कृती विकास आराखडा तयार करा
                                                                            -  प्रमोदकुमार पवार
Ø माहिती अभियान कार्यशाळेचा समारोप
Ø जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
Ø  उत्‍कृष्‍ट ग्रामपंचायतींच्‍या कार्याचा गौरव
Ø  हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती
Ø
वर्धा,दि.02– गावांचा सर्वांगीन विकास शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून होतो. सरपंच, ग्रामसेवकांनी या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी एककेंद्राभिमुखतेने त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार यांनी केले 
समुद्रपूर येथे पंचायत समिती सभागृहात जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने ‘योजना आपल्‍या द्वारी’ माहिती अभियान कार्यशाळा 2016 च्‍या समारोप कार्यक्रमाप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक श्रीपाद अपराजित यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती नंदाताई साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेसरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वहाने, गट विकास अधिकारी श्री. लोंढे, हिंगणघाटच्या गट विकास अधिकारी स्वाती इसाये, सर्व पंचायत समिती सदस्‍य यांची उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले, नांदेड जिल्ह्यामध्ये डासमुक्त गाव मोहीम अत्यंत उत्कृष्टपणे तेथील प्रशासन राबवित आहे. त्यामुळे तेथील गावांच्या आरोग्याची समस्या दूर होण्यास मदतच झाली आहे. हिवरे बाजार गावाने आपल्याला आदर्श गावाचे चित्र कृतीतून दाखविले आहे. असाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर दीर्घकालीन योजना राबवून गावातील उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांसह, सरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिका-यांनी  केंद्रासह राज्याच्या योजनांचा लाभ घ्यावा. या योजना एकत्रितपणे गावात राबवून लोकसंख्या, पाणी, आधुनिक शेती, कमी दरात अधिक उत्पादन याचा ध्यास घ्यावा. यासाठी कृती करावी.  गावाचा विकास करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. कौशल्य विकासावर आधारीत उद्योगाची निवड करावी. तसेच गावातील विकासाचा प्राधान्यक्रम ठरवून उत्पन्नवाढीचा विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  जलयुक्त शिवाराच्या कामांतही लोकसहभाग वाढावा या करीता प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले, एककेंद्राभिमुखता संस्कृतीतून विकास साधणे सोपे होते. शासकीय योजनांची गुंफन करून गावाच्या विकासावर प्रत्येकाने भर देणे महत्त्वाचे आहे. दूरदृष्टी ठेवून कार्य केल्यास योजनांचा लाभ दीर्घकाळापर्यंत मिळण्यास मदत होते. आदर्श संकल्पना आपल्या अवतीभोवतीच असतात, ती पाहण्याची, अनुभवण्याची आणि कृती करण्याची गरज आहे. कौशल्य आपल्यात आहे परंतु ते शोधता आले पाहिजे. शेती आहे त्याबरोबरच शेतीला पूरक व्यवसाय निवडून आर्थिकस्थैर्य, स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पद्धतशीरपणे नियोजन करायला हवे. नेमून दिलेल्या कामामध्ये आस्थेने सहभागी होणेही महत्त्वाचेच आहे, त्यासाठी सकारात्मकरित्या व नवदृष्टीने सहनशीलतेने आपली कार्ये पार पाडावीत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्या गावासाठी करून द्यावा व शाश्वत विकास साधण्यावर भर द्यावाअसेही ते म्हणाले.
पंचायत समिती सभापती नंदाताई साबळे यांनीही अभियानाचे कौतूक करून सरपंच आणि ग्रामसेवकांनी शासनाच्या योजनांचा लाभ गावा-गावातील लोकांना करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेसरे यांनी स्वच्छतेचा सर्वांनी संकल्प करून गावागावात शौचालयाची उभारणी करावी. त्याचे महत्त्व सर्वांना पटवून द्यावे, असे सांगितले.
            वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन म्हणाले, माहिती अभियान कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून अनेक लोककल्‍याणच्‍या योजना लोकांपर्यंत पोहोचण्‍यास मदत होते. विविध ग्रामपंचायती चांगले नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून गावांचा विकास साधत आहेत. उमरी मेघे ग्रामपंचायतीने सातत्‍यपूर्णरित्‍या तीन वर्ष 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्‍यात यश मिळविलेले आहे. जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍यात येत आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवकच गावाचा कायपालट करु शकतात.              पाण्याचे योग्य नियोजन ही भविष्याची गरज असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य पाणी वापराचे नियोजन करणारे एकमेव राज्य असल्याचे सांगितले. तसेच वर्धा पॅटर्न, माथा ते पायथा या संकल्पनेवर जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
               जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी गवळाऊ गायी, त्यांचे संवर्धन, चारा पद्धती यावर सविस्तर माहिती सांगून शेतक-यांनी चारा पद्धतीचा अवलंब करून जनावरांचा चारा स्वत्:च्या शेतात पिकविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. जांगडा यांनी फसल विमा योजना, अटल पेंशन योजना, जनधन योजना आदी बाबींवर यावर प्रकाश टाकला.
                जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती  यांनी  कमी खर्चात शेती करण्याचे आवाहन शेतक-यांना करून याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले. शासनाच्या विविध कल्याणकारी व लोकोपयोगी अशा योजना आहेत. त्यांचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, एकात्मिक पाणलोट क्षेत्र, महात्मा फुले जलसंधारण आदींसह शेती, शेतीसंबंधीत उपाययोजना, बी-बियाणे आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली. तसेच जलसंवर्धनासाठी सर्वांनी पुढे येऊन पाणी बचतीसाठी योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
            ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वहाने यांनीही प्रत्येकाने नळावर मीटर बसवावे. पाण्याचा सुयोग्य वापर करावा, असे सांगून 24 बाय 7 योजनेचे महत्त्व सांगितलेगटविकास अधिकारी श्रीमती इसाये यांनीही विचार मांडले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन विनेश काकडे यांनी केले. आभार माहिती सहायक श्याम टरके यांनी मानले.
उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या कार्याचा गौरव
हिंगणघाट तालुक्यातील वणी , कौसुर्ला (मो.) आणि समुद्रपूर तालुक्यातील पिंपळगाव आणि गोविंदपूर या ग्रामपंचायतींनी गावामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्याहस्ते स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला  
0000






No comments:

Post a Comment