Saturday 15 December 2012

तुषार व ठिंबक सिंचन संच अनुदान रकमेत वाढ


* अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतक-यांसाठी 60 टक्‍के
      * बहुभूधारक शेतक-यांसाठी 50 टक्‍के
      * ऑनलाईन ई-ठिंबक व्‍दारे प्रस्‍ताव सादर करण्‍याची सुविधा               
वर्धा दि.15- राष्‍ट्रीय सूक्ष्‍म सिंचन अभियान सन 2012-13 मध्‍ये तुषार व ठिंबक सिंचन संचाच्या अनुदानासाठीचे शेतक-यांचे प्रस्‍ताव संगणक प्रणालीव्‍दारे (ऑनलाईन ई-ठिबक) www.mahaagri.gov.in या वेबसाईटव्‍दारे  स्वीकारले जातील.
तुषार व ठिंबक सिंचन पध्‍दती पाणी वापरामुळे 50 ते 60 टक्‍के पाण्‍याची बचत होते.सिंचन पद्धतीमुळे लोडशेडींग असतांना देखील कमी वेळेत,अधिक क्षेत्राला एकसमान पाणी देता येते.या पध्‍दतीमुळे विद्राव्‍य खतांचा कार्यक्षम वापर करता येतो.मजुर व वेळेची बचत होते. पिकाची जामाने वाढ होत,पाणी वापर क्षमता वाढविण्‍यासाठी ठिंबक व तुषार  सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे.
जिल्‍ह्यास दिलेल्‍या उद्दिष्‍टानुसार ऑनलाईन अर्ज केलेल्‍या शेतकऱ्यांना तालुक्‍यातील  क्रमवारीनुसार तालुका कृषी अधिकारी यांनी संमती दिल्‍यानंतर शेतक-यांच्‍या पसंतीप्रमाणे नोंदणीकृत कंपनीच्‍या वितरकाकडून सूक्ष्‍म सिंचन संच बसविता येईल. संच बसविल्‍यानंतर लाभार्थी शेतक-याला अनुदानासाठीचा प्रस्‍ताव  तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावा लागेल. सदर प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी हे मंडळ कृषी अधिका-यांकडून मोक्‍का तपासणी करुण घेतील. मोक्‍का तपासणी  मंजुरीची नोंद संगणक आज्ञावलीमध्‍ये तालुकास्‍तरावर करण्‍यात येऊन प्रस्‍तावाची छानणी व परिगणना करुन ऑनलाईन प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी हे उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडे सादर करतील.
            उपविभागीय कृषी अधिकारी सदर प्रस्‍तावास त्‍यांच्‍या स्‍तरावर मंजुरी देऊन अनुदान अदा करण्‍यासाठी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे सादर करतील. अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक लाभार्थी शेतक-यासाठी 60 टक्‍के व बहुभूधारक शेतक-यासाठी 50 टक्‍के अनुदान लाभार्थी शेतकऱ्याच्‍या बँक खात्‍यात जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिका-यांमार्फत जमा करण्‍यात येईल.
सन 2012-13 या वर्षामध्‍ये विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमातंर्गत (viidp) या योजनेत सूक्ष्‍म सिंचन हा घटक असून तुषार सिंचन पध्‍दतीसाठी अर्थसहाय्य  2 हेक्‍टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्‍टरी एकूण किंमतीच्‍या 50 टक्‍के (इतर शेतकरी) व एकूण किंमतीच्‍या 75 टक्‍के अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतक-याकरीता वैयक्‍तीक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्‍था या बाबींचा लाभ घेऊ शकतो.
ठिंबक सिंचन पध्‍दतीसाठी अर्थसहाय्य 2 हेक्‍टर क्षेत्रापर्यंत प्रतिहेक्‍टरी एकूण किंमतीच्‍या 50 टक्‍के (इतर शेतकरी) व किंमतीच्‍या 75 टक्‍के अल्‍प व अत्‍यल्‍प,मागास भूधारक शेतकऱ्याकरिता  वैयक्‍तीक शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी सहकारी संस्‍थाही याबाबीचा लाभ घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी आपले गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाडे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment