Saturday 5 January 2013

रोजगार हमी योजनेतील मजुरांची रक्‍कम यापुढे मजुरांच्‍या बँक खात्‍यात जमा - आयुक्‍त


                   वर्धा दि.5 – केंद्र पुरस्‍कृत महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्‍यातील चार जिल्‍हे प्रायोगिक तत्‍वावर घेण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये पुणे,नंदुरबार,अमरावती व वर्धा या जिल्‍ह्याचा समावेश आहे.या योजनेअंतर्गत  अमरावती व वर्धा जिल्‍ह्यातील तालुका निहाय दोन गावांची निवड करण्‍यात आली आहे. या गावातील काम करणा-या मजुरांची रक्‍कम थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यामध्‍ये येत्‍या 26 जानेवारी पासून जमा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेचे आयुक्‍त एस.संकरनारायण यांनी दिली.
ईलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन पध्‍दतीवर आज विकास भवन येथे तहसीलदार,गटविकास अधिकारी,सहाय्यक लेखाधिकारी यांची कार्यशाळा संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍यांनी माहिती दिली. यावेळी उपसचिव आर.विमला,रोहयोचे उपजिल्‍हाधिकारी सानियार, उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव व अमरावतीचे उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) बावणे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
महाम्‍मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मागेल त्‍या हाताला काम देण्‍याचा संकल्‍प केंद्र शासनाने यापूर्वीच जाहीर केला असल्‍याचे सांगून संकरनारायण म्‍हणाले की, आता अमरावती व वर्धा जिल्‍ह्याने आधार कार्ड व बॅक खाते उघडण्‍यासाठी नेत्रदिपक अशी कामगिरी केलेली आहे.त्‍यामुळे विदर्भातील अमरावती व वर्धा जिल्‍ह्याची निवड करण्‍यात आली आहे. ईलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन पध्‍दतीनुसार रोहयो अंतर्गत काम करणा-या मजुरांची मजुरी थेट त्‍यांच्‍या खात्‍यामध्‍ये जमा केली जाणार आहे. कामाचे मुल्‍यमापण केल्‍यानंतर त्‍या-त्‍या तालुक्‍याचे तहसीलदार व संवर्गविकास अधिका-या मार्फत मजुरीची रक्‍कम बँकेत जमा करण्‍यात येणार आहे.
मजुरांची मजुरी देण्‍यासाठी होणारा विलंब या पध्‍दतीने संपुष्‍टात येणार आहे. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्‍यात येणार असून ग्रामसेवकांकडून गावातील मजुराचे नांव  कोणत्‍या बँकेत त्‍यांचे खाते आहे.तसेच त्‍यांचे खाते क्रमांक अचूक आहेत किंवा कसे याबाबत ग्रामसेवक खात्री करतील.
         वर्धा जिल्‍ह्यातील तालुकानिहाय माहितीनुसार तहसीलदार व संवर्गविकास अधिकारी यांनी  निवड केलेल्‍या गावामध्‍ये कंसाबाहेरील गावे ही संवर्गविकास अधिकारी यांनी तर तहसिलदार यांनी निवड केलेली गावे ही कंसामध्‍ये दर्शविली आहे.
         वर्धा तालुका येसंबा (आंजी मोठी) सेलू तालुका खापरी (केळझर) देवळी तालुका कोल्‍हापूर (नाचणगाव) आर्वी तालुका पिंपळखुटा(नांदोरा) आष्‍टी तालुका मोही
 (लहानआर्वी) कारंजा तालुका बोरी (जसापूर) हिंगणघाट तालुका कातगांव (कळाजता) समुद्रपूर तालुका दसोडा (दहेगांव) आदि आहेत.
            अमरावती जिल्‍ह्यातील तालुका निहाय निवड केलेली गावे तहसिलदारांनी निवडलेली गावे कंसाबाहेर व संवर्गविकास अधिकारी यांनी निवडलेली गावे कंसामध्‍ये आहे. अमरावती तालुका सिराड (आंजणगाव बारी) भातकुटी तालुका खार तळेगांव (वायगांव) नादगाव खंडेश्‍वर तालुका माहुली (खुमगांव) वरुड तालुका सातनुर (चांदस) मोर्शी  तालुका पिंपळखुटा (भिबी) तिवसा तालुका शिवणगाव (सार्सि) अचलपूर तालुका उपालखेडा (रामपूर बद्रुक) चांदूर बाजार तालुका सिरसगाव (निमखेडा) चांदूर रेल्‍वे तालुका सिरोडी (येरड बाजार) अंजणगाव तालुका सातेगांव (पांढरी) धारणी तालुका झिलपी (विजूधावडी ) चिखलदरा तालुका गांगरखेडा (सेमाडोह) दर्यापूर तालुका टिलोरी (डोंगरगांव) धामणगाव तालुका अशोकनगर (जुना धामणगाव) यांची निवड केलेली आहे.या गावामध्‍ये लोक प्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी यांच्‍या हस्‍ते या योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्‍यात यावा अशा सूचनासुध्‍दा त्‍यांना देण्‍यात आल्‍या आहे. ई मस्‍टर  च्‍या नोंदी अद्यावत करण्‍याचे सूचना देवून संगणकाचा डाटा सुध्‍दा अद्यावत करण्‍यात यावा जी कामे अपूर्ण राहिलेली आहेत त्‍याला प्राधान्‍याने पूर्ण करुण संगणक प्रणालीत आवश्‍यक ते बदल करण्‍यात यावे. अपूर्ण कामे पूर्ण करतांना त्‍यावरील झालेला खर्च संगणकातून कमी होणार नाही याची दक्षता घेवून संबंधित संगणक चालकाला सूचना द्यावी अशा सूचना यावेळी करण्‍यात आल्‍या.        
यावेळी बोलतांना उपसचिव आर.विमला यांनी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेतील अडी-अडचणीचे निराकरण करुण संगणकावर माहिती कशा पध्‍दतीने भरावी याचे प्रात्‍यक्षिक करुण सांगितले. प्रायोगिक तत्‍वावर विदर्भातील अमरावती व वर्धा ही दोन जिल्‍हे असल्‍यामुळे ही कार्यपध्‍दती यशस्‍वी ठरल्‍यानंतर क्रमा-क्रमाने संपूर्ण महाराष्‍ट्रात राबविल्‍या जाईल या प्रणालीमुळे कर्मचा-यांचे श्रम व कागदाची बचत होईल तसेच निधीच्‍या गैरवापराला आळा बसेल. पुरुष व महिला मजुरासाठी बँकेत वेग-वेगळे खाते उघडावयाचे आहे. त्‍यांची खाती भारतीय डाकघरामध्‍ये आहे त्‍यांनासुध्‍दा मजुरीची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यावर थेट जमा होईल.यासाठी संगणकावर कार्यप्रणाली समजावून सांगितली.
जिल्‍हास्‍तरावर एक खाते व त्‍यानंतर तालुकास्‍तरावरील अधिका-याचे नावे प्रत्‍येकी एक खाते राहणार असून या खात्‍यामधूनच संबंधित मजुरांच्‍या खात्‍यामध्‍ये इलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन प्रणालीव्‍दारे रक्‍कम जमा होईल.
         महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेमध्‍ये निधीची कमतरता नाही मात्र कार्यान्वित यंत्रणेने त्‍यांचे वार्षिक उद्दिष्‍ट ठरवून त्‍यानुसार आगामी काळात निधीची मागणी करावी. अवास्‍तव मागणी केल्‍यास त्‍यांची कारणे त्‍यांना द्यावी लागतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
या कार्यक्रमाला अमरावती व वर्धा जिल्‍ह्यातील तहसीलदार व संवर्गविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव यांनी तर संचलन व आभार अजय धमाधिकारी यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment