Friday 30 September 2011

जीवन अन् प्रदूषण... !


विशेष लेख                  जिल्हा माहिती कार्यालय      
  वर्धा, दि.30/9/2011

जल अर्थात जीवन असं आपण म्हणतो हेच जीवन प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणावर घातक ठरु शकते याची जाणीव असून देखील आपण जल प्रदूषण रोखण्याप्रती सजग नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.
साधारणपणे माणसाला होणा-या आजारांपैकी 70 टक्के आजार हे दुषित पाण्यामुळे होतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लहान बालकांना याची लवकर बाधा होत असते. शहरी भागात जिथे पाणीपुरवठा नळाव्दारे होतो तेथे किमान चांगल्या दर्जाचे पाणी पिण्यास उपलब्ध असते.
ज्या भागात नळाव्दारे पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी नागरिक भूमीगत पाण्याच्या साठ्यावर किंवा नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. नदी पात्रात कपडे धुण्यापासून थेट कारखान्यातील प्रदूषित सांडपाणी सोडण्यापर्यंत अनेक माध्यमातून पाणी पिण्यालायक आपणच ठेवत नाहीत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया केल्यावरच ते     नदी-नाल्यात सोडावे असे नियम आहेत. या नियमांची पायमल्ली करीत सर्रासपणे पाणी प्रदूषित करणारे अनेक उद्योग आसपास दिसतात. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे असं नाही तर त्या भागातील नागरिकांनी जागरुकपणे यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे प्रदूषण करणा-यांबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळविले पाहिजे.                  
लहान मुलांना पाणी स्वच्छ आणि पिण्यालयक असे देणे ही शाळांचीही जबाबदारी आहे. शाळांमधून जे पाणी उपलब्ध असते त्याची वेळोवेळी तपासणी करुन घेणे त्याचप्रमाणे साठवण टाक्यांची स्वच्छता आणि निर्जतुंकीकरण याबाबत शाळांनी जागरुकता दाखवायला हवी. पालकांनीही याबाबतीत जागरुकता बाळगण्याची नितांत आवश्यकता आहे.
पावसाळ्यात जलप्रदूषणाचा स्तर अधिक वाढतो त्यामुळे या काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पाणी गाळून आणि उकळून पिणे हा सर्वोत्तम उपाय असतो. प्रत्येकानेच याबाबत सजगता दाखविली तर यामुळे पसरणा-या आजारांचे प्रमाण निश्चितपणे नियंत्रणात राखता येईल.
                        - प्रशांत दैठणकर
                00000

No comments:

Post a Comment