Friday 30 September 2011

कामगारांचे मुलभूत प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन कटिबध्द - हसन मुश्रीफ


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 30 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------
       
     वर्धा,दि.30-हिंगणघाटच्या औद्योगिक परिसरात कामगारांना मिळणा-या न्याय हक्कापासून व्यवस्थापक अद्यापही संबधितांना वंचित ठेवीत आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले असून औद्योगिक क्षेत्रामध्ये कामागारांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी शासन गंभिर असून कामगारांचे मुलभूत प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन सदैव कटिबध्द आहे असे प्रतिपादन कामगार व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
     काल हिंगणधाटच्या श्रमिक भवनामध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मिल मजदूर संघटना चंद्रपूरचे  अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया , नगराध्यक्ष अड.सुधिर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघटन हिंगणघाट चे अध्यक्ष अफताब खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
     कामगारांचे होणारे आर्थिक शोषण दूर करण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचे सांगून कामगार मंत्री मुश्रीफ म्हणाले की कामगारांना कुशल, अकुशल, अर्धकुशल व कंत्राटी दाखवून व्यवस्थापक कामगारांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवीत आहे.यापुढे मात्र कामगारांच्या हक्काचे व न्यायोचित मागण्यांना सर्वोच्च प्राधान्य देवून त्यांना वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेलया कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा उपाय योजना केल्या जातील. व्यवस्थापकांनी याकडे कानाडोळा केल्या  त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्वानीचा इशाराही देवून कामगारांच्या श्रमाचे व घामाचे मोल विनाकरण वाया जावू देणार नाही असेही ते म्हणाले.
समाजाच्या दूर्बल, वंचित वृध्दापकाळातील ज्येष्ठ नागरिकांच्या विकासासाठी शासन आर्थिक सहाय्य योजना राबवित असून त्यासाठी अनुदानही दिल्या जाते. अनेक माता-पिता आयुष्यभर कष्ट करुन मुलांना मोठे करतात व नोकरी करण्यासाठी सक्षम करतात मात्र हेच मुले वृध्दाकाळातील आई वडिलाकडे दूर्लक्ष करीत असतात. शासनाने या बाबत समाधानकारक तोडगा काढला असून जी मुले आपल्या आई वडीलाकडे दुर्लक्ष करतात व जी मुले नोकरीत आहेत अश्या मुलांच्या पगारातून त्यांच्या आई व वडीलांच्या पालन पोषणासाठी पगरातून कपात करण्यात येईल.त्यामुळे वृध्दापकाळात जीवन जगणा-या आई-वडिलांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. कामगारांना दारिद्र्य रेष खालील योजनेचा लाभ मिळण्यासाठी कामगार विमा योजने अंतर्गत सिमा विस्तारणासाठी करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न केले जातील असे सांगून ते म्हणाले की श्रावण बाळ योजना, संजय निराधार योजना व अंत्योदय योजनेचे उत्पन्नाचे निकष वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष पदावरुन बोलतांना पुगलिया म्हणाले की कामगार हा समाजातील महत्वपूर्ण घटक असून, गेल्या अनेक वर्षापासून कामगारांच्या न्याय हक्काच्या चळवळीत सहभागी होऊन व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य केलेल्या आहे. हिंगणघाट परिसरातील व्यवस्थापकांच्या  आळमुठे धोरणामुळे कामगारांवर आर्थिक संकट ऊभे ठाकले असून ते दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.                               
प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष कोठारी म्हणाले की कामगारांना कुठलीही जात नसते. कामगार हा कामगार असतो. कामगारांचे होणारे शोषण दूर करण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
 राष्ट्रीय मिल मजूर कामगार संघटनचे अध्यक्ष अफताब खान यांनी कामगारांवर होणा-या अन्यायाची माहिती देवून त्यांच्यावर होणा-या दडपशाहीची माहिती तपशीलाने त्यांनी आपल्या  भाषणात दिली.
या कार्यक्रमाचे संचलन व आभार बोकारे यांनी केले. यावेळी मोहता मिल, पिव्ही टेक्सटाईल, गिमा टेक्स व बुरकाणी येथील औद्योगिक क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                     00000

No comments:

Post a Comment