Thursday 29 September 2011

शालेय पटपडताळणीसाठी अधिकारी वर्गाला प्रशिक्षण


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
     वर्धा, दि. 29- जिल्ह्यात होणार असलेल्या शालेय पटपडताळणीसाठी नियुक्त पथक प्रमुखांना या पडताळणीबाबत आज विकास भवन येथे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात 3 ते 5 ऑक्टोंबर दरम्यान ही पडताळणी होणार आहे.
     जिल्ह्यात असणा-या पहिली ते बारावी वर्गाच्या 1457 शाळांमधील 2 लाख 41 हजार 417 विद्यार्थ्यांची पटपडताळणी जिल्हा प्रशासन करणार असून, यातून शिक्षण विभागाला बाजूला ठेवण्यात आले आहे.
     या प्रशिक्षणाच्यावेळी जिल्हाधिकारी जयश्री भोज, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले तसेच इतर उपविभागीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. पडताळणीत नेमक्या कोणत्या बाबींवर काम करायचं आहे याबाबत यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.
     जिल्ह्यात 3 दिवसात होणा-या या अभियानासाठी 130 पथके निर्माण करण्यात आली आहे. प्रतिदिन 113 पथके पडताळणीचे काम करतील. या कामासाठी जिल्हाधिकारी हे पडताळणी समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष असून निवासी उपजिल्हाधिकारी समन्वयकाचे काम करीत आहे.
     प्रशासकीय भवन येथे डाटा एन्ट्रीसाठी 40 संगणक असलेला कक्ष निर्माण करण्यात आला आहे. सर्व शाळांकडून प्राप्त माहिती येथे एकत्रित करण्यात येत आहे. असे शिक्षणाधिकारी (मा.) लक्ष्मीनारायण सोनवणे व शिक्षणाधिकारी (प्रा.) विवेक बोंदरे यांनी सांगितले. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी       3 वाजता विकास भवन येथे होणार असून, तेथेच साहित्य वाटप होणार आहे.
                    महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
 शालेय पटपडताळणी काळात
               जिल्हाभर 144 कलम लागू
वर्धा, दि.29- जिल्ह्यात 3 ते 5 ऑक्टोंबर दरम्यान होणारे पटपडताळणीचे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा जयश्री भोज यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यात 3 ऑक्टोंबरचे 00.01 वाजेपासून 5 ऑक्टोंबरचे 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांची पूर्व नियोजित सहल, प्रशिक्षण तसेच अभ्यास दौरा या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची सामुहीक वाहतूक करण्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात  आलेला आहे.
वर्धा जिल्ह्यात होणा-या शालेय पटपडताळणीमध्ये काही संस्थाचालक बाहेरील जिल्ह्यातून तसेच जिल्ह्यांतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करुन ने-आण करण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे.अशा वाहतूकीस प्रतिबंध व्हावा व विद्यार्र्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता हे कलम लागू करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment