Thursday 29 September 2011

हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजारात कापूस तारण योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार - कृषी मंत्री


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.29-कापूस उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेली कापूस तारण योजना शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणारी ठरली असून, ही योजना यापुढे राष्ट्रीय कृषि  विकास योजनेमध्ये अंतर्भूत करुन अधिकाधिक कापूस उत्पादक शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून संरक्षण देणार असल्याने या योजनेसाठी 70 टक्के अनुदानासह शासन पुरेशी रक्कम उपलब्ध करेल.ही योजना हिंगणघाटच्या कृषि उत्पन्न बाजारात कापूस तारण योजना म्हणून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येईल अशी घोषणा कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
     हिंगणघाट येथे काल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात कृषिमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकेच्या व्दितीय वर्गात शिक्षण घेणा-या शेतक-यांच्या पन्नास पाल्यांना लॅपटॉपचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण, हागणदारी मुक्त झालेल्या गावांना धनादेशाचे वाटप.अल्लीपूर ग्रामपंचायतीतील सदस्यांचा सत्कार व कापूस उत्पादक शेतक-यांना तारण योजने अंतर्गत धनादेशाचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी विदर्भ पाटबंधारेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. सुरेश देशमुख, जि.प.उपाध्यक्ष सुनिल राऊत, जि.प.सभापती मोरेश्वर खोडके, पंचायत समिती सभापती इंदिराताई उरकुडकर, सुधिर कोठारी, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, माजी आमदार डॉ.वसंत बोंडे, दिलीप काळे व जिल्हा कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डावरे व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.                                          

निसर्गाच्या अवकृपेने कृषि उत्पादनात घट वा वाढ होते याचा थेट परिणाम शेतक-यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असल्याचे सांगून कृषि मंत्री विखे पाटील म्हणाले की, कापूस उत्पादक    शेतक-यांना कापसाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल होत असतो. त्यांच्या उत्पादक मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कापूस तारण योजना राबविण्यात येत असून, या योजनेच्या माध्यमातून    शेतक-यांची होणारी पिळवणूकीला निश्चितच पायबंद बसेल व    शेतक-यांना संरक्षण मिळून आर्थिक लाभ सुध्दा पदरात पाडून घेता येईल. हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीने कापूस तारण योजना राबवून शेतक-यांच्या हिताचे नेत्रदिपक असे कार्य केले आहे. आगामी काळात पंचविस, पन्नास व शंभर शेतक-यांचा एक समुह तयार करुन रासायनिक खते व बि-बियाणे पुरविण्याचा शासनाचा संकल्प असून, या योजनेमुळे आतापर्यंत शेतक-यांची होणारी फसवणूक थांबणार असून, घरपोच रासायनिक खते व बि-बियाणे उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.
पावसाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय शेतक-यांनी करावा. दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कुट पालन व्यवसाय केल्यास   शेतक-यांवर येणारी आर्थिक संकटे दूर होण्यास मदत होईल. कृषि उत्पन्न बाजार समितीने अभियांत्रीकीचे शिक्षण  घेणा-या   शेतक-यांच्या पाल्यांसाठी लॅपटॉपचा घेतलेला निर्णय निश्चितच गौरवपूर्ण असून, ही भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक ठरणारी आहे. तसेच त्यांचे कुटूंब संगणक साक्षर होतील असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले की, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपक्रम शेतक-यांच्या हिताचे व संरक्षणासाठी असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उपयुक्त कार्य होत असल्याचे त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी आमदार सुरेश देशमुख म्हणाले की,शेतक-यांसाठी विविध योजना व उपक्रम राबवून कृषि उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकीसोबत प्रगतीच्या उज्वल भविष्याच्या दिशेने बाजार समिती मार्गक्रमण करीत आहे.
यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या प्रास्ताविक भाषणातून डॉ.सुधिर कोठारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीचा आलेख विस्तारीतपणे सांगितला.
यावेळी मान्यवरांचे हस्ते शेतक-यांच्या पाल्यासाठी 50 लॅपटॉपचे वितरण , कापूस तारण योजने अंतर्गत 700 शेतक-यांना  14 हजार क्विंटल कापसाचे 1 कोटी 40 लक्ष रुपयाचे धनादेशाचे वितरण, हागनदारी मुक्त गावांना 1 लाख 50 हजार रुपयाचा धनादेश वितरण, 3 हजार 500 विद्यार्थ्यांना वर्कबूक पुस्तकाचे वितरण व शेतक-यांचा नेट सेट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचलन ओम डालीया यांनी तर आभार प्रदर्शन हरिष वडतकर यांनी केले. याप्रसंगी पंचायत समितीचे व नगर पालीकेचे पदाधिकारी व अधिकारी, अडते, दलाल, व्यापारी व सामान्य नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                     00000

No comments:

Post a Comment