Wednesday 28 September 2011

आर्थिक सक्षमीकरण महिलांचं


विशेष लेख     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. 28 ऑगस्ट 2011
----------------------------------------------------------------

     नवरात्र हा दुर्गा पुजनाचा काळ. दुर्गा ही शक्ती देवता आहे. या काळात केवळ रास गरबा किंवा जागरण होते असं नाही तर हा एक मोठा महोत्सव असतो. समाजात दुर्गेचं स्थान असणा-या नारी शक्ती बाबत या निमित्तानं मंथन व्हावं या उद्देशानं ही खास लेखमाला.
                                        प्रशांत दैठणकर
_____________________________________________
महिला गेल्या चार दशकात मोठ्या प्रमाणावर शिकल्या आणि त्यामुळे त्यांना नोकरीसाठी संधीही मिळायला लागली. त्यामुळे समाजातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. गेल्या 50 वर्षात या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याचे दिसते.
     मुंबईत यंत्र युगाच्या काळात गिरणी कामगार मोठ्या प्रमाणावर होते. कारखाना म्हटल्यावर तिथं महिलांना काम करण्याची संधी नव्हती. नंतरच्या काळात कार्पोरट युग आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली मात्र ती संधी सेक्रेटरी लिपिक अशाच पदांची असायची.
     स्वातंत्र्यानंतर महिलांना चांगल्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली तर काही कर्तबगार महिलांनी स्वत:साठी अशी संधी निर्माण करीत नवनविन क्षेत्रांत प्रवेश केला.
     स्वातंत्र्योत्तर काळात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीच्या रुपाने सत्तेचे सर्वोच्च पद महिलेकडे आले. त्यानंतर समाजात महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अनेकजणींना यश मिळाले.
          क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव उज्‍ज्वल करणा-या सानिया मिर्झा, सायना नेहवाल, तेजस्वीनी सावंत सारख्या आजच्या पिढीच्या महिलांना 60 च्या दशकाच्या तुलनेत कमी संघर्ष सहन करावा लागला. ऐश्वर्या रॉय-बच्‍चन आणि सुस्मिता सेन यांनी 90 च्या दशकात आपल्या सौंदर्यांच्या जोरावर वै‍श्विक स्थान प्राप्त करुन देशाचं नाव उंचावलं.
     स्त्री म्हटल्यावर अमुकच करिअर हवं अशी पालकांची विचारसरणी राहिलेली नाही. पालक हल्ली मुलींना संधी देण्याचा प्रयत्न करतात याचं कारण अर्थातच घरात शिकलेली आई असणं हेच आहे. स्त्री शिक्षणाचा फायदा आजच्या पिढीला मिळत आहे. आज शहरी भागात कमावत्या स्त्रियांचे प्रमाण वाढलेले आहे.
     कल्पना चावला, इंदिरा नुवी यांनी वेगळी क्षेत्रं आपण निवडू शकतो आणि त्यात उंचीपर्यंत जाऊ शकतो हे दाखवून दिलं. पेप्सीको सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सर्वोच्य पदावर इंदिरा नुवी पोहचल्या तर कल्पना चावला अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला ठरली. पृथ्वीवरचं उंच शिखर पादाक्रांत करणारी बचेंद्री पालही यात आहे. आणि या सर्व महिला आजच्या पिढीच्या समोर आदर्श म्हणून आहेत.
     पोलिस दल व सैन्यात स्त्रिया हा विचार काही काळापूर्वी नव्हता मात्र आज चित्र बदललं आहे. देशाचं सर्वोच्‍च पद अर्थात राष्ट्रपती पद प्रतिभा पाटील यांना मिळालं  त्याच प्रमाणे लोकसभेचं सभापतीपद मीरा कुमार यांना मिळालं या पदांवर येणारी पहिली महिला असल्याचा मान त्यांनी मिळवला.
     एकीकडे आर्थिक सक्षमीकरणात वाढ झाली असली तरी दुसरीकडे घरच्या चक्रातून मात्र त्यांची सुटका झालेली नाही. म्हणूनच नारी शक्तीच्या या वाटचालीचं कौतूक करायचं.
                         00000

No comments:

Post a Comment