Monday 26 September 2011

3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात महत्वाकांक्षी शालेय पटपडताळणी


 महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.    *             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.26 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.26- शाळांमधील बनावट विद्यार्थी संख्या शोधण्याच्या हेतूने 3 ते 5 ऑक्टोंबर दरम्यान वर्धा जिल्ह्यात शालेय पटपडताळणीचा महत्वाकांक्षी उपक्रमा होत आहे. या उपक्रमासाठी प्रशासनातर्फे जोरदार तयारी करण्यात येत आहे.
     जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी याबाबत आढावा घेऊन  होणा-या पडताळणीबाबत संबंधित अधिका-यांना मार्गदर्शन केले. नांदेड जिल्ह्यात या स्वरुपाचा प्रायोगिक उपक्रम झाला होता त्यात 20 टक्के पटनोंदणी बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत ही तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
     वर्धा जिल्ह्यात पहिली ते बारावी अशा प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या दोन हजाराहून अधिक आहे तर यातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे अडीच लाख आहे. या पटपडताळणीचे वैशिष्ट म्हणजे यात शिक्षण विभाग सोडून शासनाचे इतर सर्व विभाग काम करणार आहे. ज्याचे नेतृत्व महसूल विभाग करेल
     जिल्ह्यात शाळांमधून 1 ऑगष्ट 2011 रोजी शाळेतील हजेरी पटाच्या झेरॉक्स प्रती प्रशासनाने प्राप्त करायच्या व त्यानुसार प्रत्येक शाळेत 5 जणांच्या पथकाने प्रत्यक्ष तपासणी करायची असे या तपासणीचे स्वरुप आहे. एकाच विद्यार्थ्यांची दुस-यांदा गणना होवू नये याकरिता निवडणुकीत करतात त्या पध्दतीने मुलांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर अर्थात तर्जनीवर शाईदेखील लावली जाणार आहे.
     या उपक्रमात येणारे अडथळे लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लावण्यात येत आहे तसेच संवेदनशील शाळांची यादी करुन या शाळांची विशेष तपासणी होणार आहे. बाजूच्या गावांमधून विद्यार्थ्यांना घेऊन येण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेशही जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment