Monday 26 September 2011

‘स्‍वागत स्‍त्री जन्‍माचे’




झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, चांदबिबी, रजीया सुल्‍तान, मदर तेरेसा, कल्‍पना चावला ही नावे की डोळ्यासमोर आली की या महात्‍म्‍यांचा आदर्श उभा राहतो. इतिहासात या स्‍त्रियांनी स्‍वकर्तुत्वाने उंचीचे शिखर गाठले. वर्तमानकाळातही ब-याच महिला आजच्‍या पिढीच्‍या आदर्श ठरत आहेत. हे सर्व ठिक असले तरी समाजात दिवसेंदिवस महिलांचे कमी होणारे प्रमाण पाहिले तर भविष्‍यात आदर्शसाठीच नव्‍हे तर आई, बहिण किंवा पत्‍नी म्‍हणून स्‍त्री राहील का, असा प्रश्‍न निर्माण होतो.

दिवसेंदिवस समाज प्रगत होत असला तरी स्‍त्री भ्रूण हत्‍येसारखे प्रकार आजही घडतात, ही शोकांतिका आहे. सुरुवातीच्‍या काळात महिलांचे अधिकार नाकारण्‍यात येत होते. आता मात्र महिलांनाच नाकारण्‍याचा आणि तिला जन्‍मालाच न येऊ देण्‍याच्‍या मानसिकतेमुळे मुलींचे प्रमाण कमी होत आहे. १९९१ मध्‍ये दर हजारी पुरुषांमागे स्‍त्रियांचे प्रमाण ९४६ होते. हाच आकडा २००१ च्‍या जनगणनेत ९१३ वर आला. तर आता २०११ मध्‍ये दरहजारी पुरुषांमागे केवळ ८८३ स्‍त्रिया असल्‍याचे विदारक सत्‍य समोर आले आहे. त्‍यामुळे समाजात महिलांचे प्रमाण वाढविण्‍यासाठी आणि स्‍त्री भ्रूण हत्‍येविरोधात जनजागृती करण्‍यासाठी परभणी जिल्‍ह्यात महारॅलीच्‍या माध्‍यमातून ‘स्‍वागत स्‍त्री जन्‍माचे’ अभियान राबविण्‍यात आले. परभणी जिल्‍ह्यातून या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाचे औचित्‍य साधून हुतात्‍म्‍यांना आदरांजली वाहिल्‍यानंतर या महारॅलीला सुरुवात झाली. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्‍या प्रांगणात पालकमंत्री प्रकाश सोळंके, सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंबकल्‍याण राज्‍यमंत्री प्रा. फौजिया खान यांच्‍या उपस्‍थितीत या महारॅलीला सुरुवात झाली. ही रॅली शिवाजी महाविद्यालय, वसंतराव नाईक पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, शिवाजी चौक, जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय या मार्गाने गेल्‍यानंतर इदगाह मैदानावर स्‍त्री भ्रूण हत्‍येविरोधात उपस्‍थितांनी शपथ घेतली.

या रॅलीत नगर परिषद, माधव ए.एन.एम. स्‍कूल, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्‍वीन्‍स हायस्‍कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, महिला आणि पुरुष होमगार्ड, जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय परिचारीका प्रशिक्षण केंद्र, भारत भारती माध्‍यमिक विद्यालय, मुंजाजी विठ्ठल शिंदे विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, राष्‍ट्रीय सेना, नूतन विद्या मंदिर, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय, मराठवाडा हायस्‍कूल, प्रभावती विद्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, परिवहन महामंडळ, तिरुपती नर्सिंग स्‍कूल, जिल्‍हा कोषागार कार्यालय, भदंत रुपाली हायस्‍कूल, जीवन प्राधिकरण, शारदा महाविद्यालय, सामाजिक न्‍याय विभाग, सुहेब ऊर्दू हायस्‍कूल, संबोधी माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक हायस्‍कूल, महात्‍मा फुले माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय सहभागी झाले होते. विद्यार्थ्‍यांच्‍या हातात महिलांचे महत्‍त्‍व विशद करणारे विविध फलक होते. सर्वांचा कळवळा एकच की उमलत्‍या कळीला मारू नका. तिलाही जग पाहू द्या.

विशेष म्‍हणजे रॅलीच्‍या सुरुवातीला स्‍वागत अश्‍व, पोलीस बॅन्‍ड, अश्‍वरुढ झाशीची राणी, होमगार्डच्‍या तुकड्या, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील मुलांचे शिस्‍तबध्‍द पथसंचलन नागरिकांचे लक्ष वेधत होते. तसेच स्‍त्री भ्रूण हत्‍येविरोधात विविध शाळा, महाविद्यालये तथा शासकीय कार्यालय व संस्‍थांच्‍यावतीने विविध प्रकारचे सजिव देखावे आणि चित्ररथ साकारण्‍यात आले होते. तसेच विविध कला पथक पोवाडे, लोकगितांच्‍या माध्‍यमातून प्रबोधन करीत होते. याशिवाय पालखी आरुढ असलेल्‍या जिजाऊंच्‍या वेशातील, झाशीच्‍या राणीच्‍या वेशातील व रजिया सुलतानाच्‍या वेशातील मुलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या महारॅलीच्‍या माध्‍यमातून सर्वांनीच ‘स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत करा’ असा संदेश दिला.

 राजेश येसनकर

No comments:

Post a Comment