Thursday 29 September 2011


                      प्रतिमेला प्रतिभेचीच प्रेरणा
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

हातात पेन्सील आणि समोर कागद आल्यावर त्याच्या डोळ्यात एक आगळी चमक दिसते. त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर मग पेन्सीलची आंदोलने सुरु होतात. रेषांवरून रेषांचे आक्रमण तर कधी मिलाफ असा प्रवास रंगत असताना त्याच्या चेहऱ्यावरील रेषांपैकी एकही रेष हलत नाही. एकाग्रता... यातून अल्पावधीत हुबेहुब पेक्षाही अधिक अशी ही प्रतिमा साकारते. अशा या कलाकाराचं नाव आहे चंद्रकांत पाठक आणि गाव आहे चंद्रपूर.

बैठकीच्या निमित्तानं चंद्रपूरला गेल्‍यावर तेथील विश्रामगृहात मुख्य सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचं भव्य असं तैलचित्र आहे. ते छायाचित्रच असल्याचा भास होतो. १९५६ साली नागपूर इंथ दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा झाला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १६ ऑक्टोबर १९५६ ला चंद्रपूर इथं असाच सोहळा झाला. यावेळी काढलेल्या एका छायाचित्रावरून हे तैलचित्र रेखाटलं आहे.

कुतूहल जागं झाल्यानं सहकारी अनिल ठाकरेला विचारलं त्यावेळी त्यानं क्षणाचा विलंब न लावता थेट चंदूला फोन लावला. चंदू पाठक नावानं इथं प्रसिद्ध असणारी ही वल्ली अर्ध्या तासात आमच्या भेटीला हजर झाली.

चंदूची भेट झाल्यावर त्याच्या कलेचा प्रचंड असा खजिनाच उघडला गेला स्वामी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील खजिन्याप्रमाणे चंदूचा खजिना खूप मोठा आहे. याची सुरुवात कधी बालपणीच्या एका उपक्रमात झालेली चंद्रपूर जवळच्या वरोरा इथलं पाठक कुटुंबिय, वडील शाळेत मुख्याध्यापक.

मुलांना सर्जनशीलता शिकता यावी यासाठी त्यांनी गावात अनेक जणांकडे असणाऱ्या वस्तू जमा करून त्यांचे प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना दिला होता. त्यात सर्जनशिलतेचा परिचय झाल्यावर चंदूने आजवर त्याचं बोट सोडलं नाही.

मनाच्या कोपऱ्यातला छंद आणि त्यानुसार उदरनिर्वाहराचं साधन असा योग चंदूच्या नशिबी असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखकाची नोकरी करीत त्यानं छंद जपलाय.

गेली सलग ११ वर्षे अभिताभ बच्च्नच्या वाढदिवसाला भेटून त्याचं सुंदरसं पेंटींग देण्याचा उपक्रम चंदू करतो. वैदर्भिय नेते शांताराम पोटदुखे यांच्या पाठींब्यावर त्याला अनेक महत्वाच्या व्यक्तींची भेट घेता आली. याचं सोनं करीत त्यानं सर्वांच्या प्रतिमा रेखाटल्यात.

छायाप्रतिमा अर्थात फोटोग्राफर याला १५० वर्षांचा इतिहास आहे. मात्र त्यापूर्वीच्या काळापासून पेंटींगच्या माध्यमातून अनेकांना आपण बघितलय. चंदूची मास्टरी खूप वेगळी आहे. तो तैलचित्र रेखाटतो पण ते छायाचित्र भासतं. प्रतिमा आणि प्रतिबिंबांच्या या जगात या प्रतिभावंतानं घेतलेली भरारी खूपच मोठी आहे.

लता मंगेशकर, डॉ. कलाम, सोनिया गांधी, राजीव गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंह आणि अनेक नावे या कलाकाराच्या कुंचल्यातून साकारली आहेत. त्याचं हे योगदान खूप मोठं आहे. सायंकाळी कार्यालय झाल्यावर ३ ते ४ तास रोज वेळ देत चंदूने आपलं कलाप्रेम जपलयं... असा हा कलाकार भेटणं हा देखील सुंदर योग म्हणावा... नंतर बैठक सुरु झाली मात्र मन त्या चित्रात गुंतलं होतं हे खरं.
·  प्रशांत दैठणकर
महान्यूजवरून साभार


विशेष लेख     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. २९ ऑगस्ट 20११
----------------------------------------------------------------
नवरात्र हा दुर्गा पुजनाचा काळ. दुर्गा ही शक्ती देवता आहे. या काळात केवळ रास गरबा किंवा जागरण होते असं नाही तर हा एक मोठा महोत्सव असतो. समाजात दुर्गेचं स्थान असणा-या नारी शक्ती बाबत या निमित्तानं मंथन व्हावं या उद्देशानं ही खास लेखमाला.
                                        प्रशांत दैठणकर
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

नारीशक्ती आणि मातामृत्यू
     आदीशक्तीचा उत्सव साजरा करताना आज घरातल्या गृहलक्ष्मीचा विचार किती जण करतात. तसेच स्वत: गृहलक्ष्मी स्वत:चा विचार करते की नाही या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच येणार हे स्पष्टच आहे कारण महिला घराची काळजी करताना इतक्या गुंतलेल्या असतात की स्वत:कडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं.
     मातेला आपण मातृशक्ती म्हणतो परंतु ही मातृशक्ती दुर्लक्षित राहत असल्याने आजही बाळंतपणात होणारे मातामृत्यू आणि बालमृत्यू आजही होतात हे वास्तव आहे आणि ही बाब आपण स्वीकारलीच पाहिजे.
     मातामृत्यूच्या कारणांचा विचार करताना जी वैद्यकीय तथ्ये समोर येतात त्यात मुळात सकस आहाराचा अभाव हे महत्वाचे कारण असते. यातही ग्रामीण भागात अशा समस्या अधिक आहेत. अर्थात शहरी भागात हे प्रमाण कमी आहे असे नाही. ग्रामीण भागाइतकीच किंचित कमी प्रमाणात शहरातही आहे. शहरात झोपडपट्टयामधून राहणारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. दारिद्रय रेषेखाली जगणा-या कुटुंबामध्ये ही समस्या अधिक आहे.
     साक्षरतेचा अभाव तसेच आरोग्यविषयक जाणीव आणि जागृतीच्या अभावापोटी ग्रामीण भागात विशेषत: आदीवासी भागात असे मृत्यू होतात. घरातच केले जाणारे वैद्यकीय उपचार तसेच गावागावात असणारा वैदूंचा प्रभाव यामुळे रुग्णालय असूनही तिथे उपचार करुन घेण्यात होणारी टाळाटाळ यामुळे असे प्रकार होतात.
     स्त्री गरोदर असते त्यावेळी तिला स्वत:चे भरणपोषण करण्यासोबतच उदरात वाढणा-या त्या बाळाचेही पोषण करायचे असते. या स्थितीत तिला सकस आणि जीवनसत्व युक्त आहाराची आवश्यकता असते. यात कमतरता आल्यास तिची आणि बाळाची स्थिती व्यवस्थित राहत नाही. यातून अनेक प्रसंगी बाळंतपणातला धोका वाढतो.
     ग्रामीण भागात असणा-या सरकारी दवाखान्यांमधून अशा स्त्रियांची नोंदणी करुन घेतली जाते. त्यांना वेळोवेळी आवश्यक अशा लोह आणि सत्व युक्त गोळ्यांचा पुरवठा अगदी मोफत केला जातो. त्याच प्रमाणे वेळोवेळी तपासण्या देखील होतात मात्र त्यासाठी सर्वांनी वारंवार या दवाखान्यांना भेट द्यायला हवी हे नक्की.
                                                - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment