Tuesday 19 July 2011

पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ- व्यक्तीमत्व विकासासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक - न्या. शिवणकर

          महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.19 जूलै  2011
--------------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.19-पोलीस विभागातील तणावपूर्ण वातावरणामुळे पोलीसांना त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाकडे पुरेसा वेळ मिळत नाही. या ताणतणावाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचे बळ व व्यक्तीमत्व विकासासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन महत्वाचे ठरते. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.शिवणकर यांनी केले.
          येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात काल मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पोलीस क्रीडा स्पर्धा प्रारंभ झाली  त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.
          याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार , न्यायाधिश दास, अप्पर पोलीस अधिक्षक यु.पी.जाधव, उपपोलीस अधिक्षक (गृह) मुरलीधर नळे, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाबा डोंगरे, देवळीचे ठाणेदार पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक पि.पि.कोलवडकर  आदि मान्यवर उपस्थित होते.
          समाजातील गुन्हेगारांना आळा घालून त्यांचेवर वचक ठेवण्याचे कार्य पोलीसांना मोठ्या प्रयासाने करावे लागत असल्याचे नमूद करुन न्यायाधिश शिवणकर म्हणाले की, पोलीसांमध्ये विनयशिलता, आज्ञाधारक, कायद्याचे पालन, जिज्ञासुवृत्ती , कार्यक्षमता, धैर्यशिलता, निर्भयता हे गुण आवश्यक आहे. मात्र अलिकडे पोलीस यंत्रणेची  प्रतिमा जनमानसात प्रतिकूल होत आहे. स्वच्छ प्रतिमेचे नवे पोलीस अधिक्षक नुकतेच रुजू झाल्यामुळे जिल्ह्यातील अवैध गुन्ह्यांना ते आळा घालून पोलीस यंत्रणेची प्रतीमा जनमानसात सुधारतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.पोलीस विभागातील कर्मचा-यांच्या अडीअडचणी व समस्यांचा विचार करुन तसेच त्यांच्यावर असलेल्या अधिकच्या  कामाच्या व्यापाचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. समाजात 5 टक्के लोक गुन्हेगारी स्वरुपाचे असतात. अश्या लोकांवर वचक बसण्यासाठी पोलीस यंत्रणेने कायद्यानुसार पाऊले उचलली  पाहीजे असेही ते म्हणाले.
          यावेळी बोलताना पोलीस अधिक्षक अविनाश कुमार म्हणाले की, क्रीडा स्पर्धेतील पोलीस कर्मचा-यांनी विभागात चमकदार कामगिरी करुन वर्धा जिल्ह्याचे नाव लौकीक करावे.
          तत्पुर्वी मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. जिल्ह्यातील चार पोलीस विभागातील स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचा-यांनी  तसेच मुख्यालयातील पोलीस कर्मचा-यांनी मानवंदना दिली तसेच शपथ ग्रहण केली.  त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी तर आभार  प्रदर्शन नळे यांनी केले. यावेळी न्यायाधिश, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                0000

No comments:

Post a Comment