Thursday 21 July 2011

ऑनलाईन मुद्रांकाची ई-कोर्ट पध्दत राज्यात सर्वप्रथम वर्धा जिल्ह्यात


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.21 जूलै  2011
-----------------------------------------------------------------
    वर्धा, दि. 21- न्यायालयीन मुद्रांक मिळण्यातील अडचणींमुळे न्यायालयात दावे करताना अशील आणि वकीलांना येणारी अडचण दूर करणारा महत्वपूर्ण ई-कोर्ट प्रकल्प वर्धा येथे सोमवार 25 जुलैपासून सुरु होत आहे. यामुळे मुद्रांक ऑनलाईन खरेदी शक्य होईल. राज्यात वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम हा प्रकल्प राबविला जात आहे हे विशेष.
प्रायोगिक स्तरावर या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात वर्धा जिल्ह्यात करावी असे निर्देश मा. मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिले त्यानुसार येथे हे काम सुरु होत आहे. असे वर्धा येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक शिवणकर यांनी सांगितले.
या कामात 5 बँकांचा सहभाग राहणार आहे. मुद्रांक खरेदीसाठी त्या बँकांमध्ये ज्यांचे खाते आहे अशा व्यक्तीकडूनही त्या खात्यावर पैसे भरुन ऑनलाइन ई-चालान घेता येणार आहे. ऑनलाईन बँकींगचे काम 24 तास होवू  शकते.
या कामात चालान प्राप्त झाल्यावर ते न्यायालयात दाखल करावे लागेल. त्यानुसार न्यायालयातील यंत्रणा ऑनलाईन पैशाचा भरणा करुन घेईल व तशी नोंद अशील आणि वकीलांना दिली जाईल. त्यानंतर लगेच दावा दाखल करता येईल अशी न्या. शिवणकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.  
या उपक्रमात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, आयडीबीआय बँक आणि इंडियन ओव्हरसिज बँक या       5 बँकाची निवड झाली आहे. या बँकेत ज्यांचे खाते आहे अशांच्या मदतीनेही ई-चालान प्राप्त करता येवू शकेल.
न्यायालयीन मुद्रांक न मिळणे ही समस्या यापुढे वर्धा जिल्ह्यात राहणार नाही. तसेच गतीमान आणि पारदर्शी काम यामुळे शक्य होईल. यामुळे या पध्दतीचा वापर सर्वांनी करावा असे आवाहन न्या. शिवणकर यांनी केले आहे.
यासाठी न्यायालयातील यंत्रणा सुसज्ज करण्यात आली असून त्याची चाचणीही झाली आहे. याची औपचारिक सुरुवात   25 जुलै रोजी होत आहे.
                     00000

No comments:

Post a Comment