Monday 19 September 2011

कापूस पिकाची सध्याची परिस्थिती व उपाययोजना


         महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.19 सप्टेंबर 2011
--------------------------------------------------------------------------------
      
      वर्धा,दि.19-गेल्या काही दिवसापासून विदर्भात सतत व जास्त पावसामुळे जमिनीत ब-याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्यामुळे कपाशीची काही झाडे मलुल होऊन सुकत आहेत. तसेच फुल पाती आणि बोंडांची गळ होत आहे. फवारणी अभावी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढून कापसाची झाडे कोकडली अशा ब-याच तक्रारी कापूस उत्पादक शेतक-यांकडून प्राप्त होत आहेत. वरील सर्व तक्रारी विषयी उपाय योजना पुढील प्रमाणे करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोल्याचे कापूस संशोधन विभाग यांनी कळविले आहे.
     मागील काही दिवसात पावसाचे एकंदर स्वरुप व प्रमाण पाहता पाऊस झालेल्या भागातील जमिनीत ब-याच काळापर्यंत पाणी साचून राहील्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत कपाशीवर पुढील परिणाम होण्याची शक्यता असते.
     कपाशीच्या मुळांना हवा मिळत नसल्यामुळे झाडामध्ये इथिलिनचे प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषन कमी होते व अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे झाडांची पान, फुले बोंडे इ. भागांना अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्याने पानाचा तजेला नाहीसा होऊन पाने मलुल पडतात. पानातील ताठरपणा कमी होतो व झाडे संथगतीने अथवा एकदम सुकतात. अशा परिस्थितीमध्ये खालील उपाय योजना कराव्यात.
     शेतातील साचलेले पाणी वर काढून त्वरीत शेताबाहेर काढून टाकावे. वापसा येता बरोबर डवरणी व खुरपणी करावी. सुसाट      वा-यासह पाणी आल्यामुळे खोडाजवळ झाड ढिले होऊन खोडाच्या बुंध्याजवळ छिद्र तयार होते व खोडाव्दारे त्यामध्ये पाणी साचते. व मुळाजवळ जाते त्यामुळे मुळांना प्राणवायु मिळत नाही व झाड सुकल्याचे आढळुन येते. झाडाचे खोड ढिले झाले असल्यास खोडाभोवती माती दाबून भर द्यावी. झाडे सुकत असल्यास दीड किलो युरीया व दीड किलो पालाश (पांढ-या रंगाचे ) 100 लिअर पाण्यात मिसळून 150 ते 200 मि.लि. द्रावण विकृतीग्रस्त झाडाच्या खोडालगत बुंध्याभोवती 24 तासाच्या आत ओतावे. कोबाल्ट क्लोराइड 10 मि.लि. ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची विकृतीग्रस्त झाडावर फवारणी करावी.कोबाल्ट क्लोराइड मुळांना हवा मिळत नसल्यामुळे झाडांमध्ये तयार होणा-या इथिलिनचे प्रमाण नियंत्रीत करण्यास मदत करते व परिणामत: झाडे सुकू देत नाही. परंतु कोबाल्ट क्लोराइडचा उपयोग झाडे सुकू लागताच त्वरीत फवारनी केल्यास होतो.झाडे सुकत असल्यास झाडाभोवती उकरी करुन बुरशीनाशक(कॉपर ऑक्सिक्लोराइड 3 ग्रॅम 1 लिटर पाण्यात किंवा कार्बेन्डॅझिम 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात) द्रावण झाडाच्या खोडावरुन जमिनीत टाकावे. साधारणत: 200 ते 250 मि.लि. द्रावण प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे. रस शोषण करणा-या किडीचा प्रदुर्भाव असल्यास आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी करावी.
     कापसाची फुल, पाती आणि बोंडाची गळ यासाठी उपाय योजना नैसर्गिक कारणामुळे होणारी पात्या, फुले बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॉलिन असिटिक असिड (प्लॅनोफिक्स) या संजिवकाची 5 मि.लि. व 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून कपाशी पेरल्यापासून 60 दिवसांनी पहिली फवारणी करावी व त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी जेणेकरुन उत्पादनात वाढ होईल.
     कपाशीची वाढ जास्त होऊन बोंडे कमी लागली असल्यास लिवोसिन 2 ते 3 मि.ली. 10 लीटर पाण्यात मिसळुन या वाढ प्रतिबंधकाची फवारणी केल्यास झाडाची वाढ थांबण्यास मदत होऊन बोंडे लागून उत्पादनात वाढ होते.
     कपाशीवरील रस शोषण करणा-या किडी बाबत बागायती व जिरायती कपाशीमध्ये सतत पावसामुळे व शेतात वापसा नसल्यामुळे फवा-या अभावी रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. सद्या परिस्थितीत रस शोषक किडीमध्ये फुलकिडे, तुडतुडे आणि
शोषक किडी पानांमधील रस शोषन करत असल्यामुळे पाने लाल-तांबडी होऊन त्यांचया कडा मुरगळतात तसेच पाने कोकडतात अशा अवस्थेमध्ये पानांवर बुरशीजन्य रोग येवून परिणामत: झाडाची प्रकाश संश्लेषन प्रक्रिया मंदावल्यामुळे झाडाची वाढ खुंटते व झाडांना पात्या, फुले व बोंडे कमी लागतात.
     यावर नियंत्रण म्हणून मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशकामध्ये डाय मिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा मिथिल डेमेटॉन 25 टक्के प्रवाही 8 मि.लि. किंवा असिटामिप्रीड 20 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी दिड ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी तसेच शेतामध्ये रीकामे डब्बे व चौकोणी 1 X 1  आकाराच्या पाट्या किंवा पिवळा रंगाचे कापड त्याला ग्रीस लाऊन झाडाच्या वर शेतामध्ये बांधावे जेणेकरुन त्याला पांढ-या माशा चीटकुन मरतील.त्याचप्रमाणे पांढरी माशी या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी असिटामिप्रीड 20 एस.पी. अडीच (2.5) ग्रॅम किंवा टायझोफॉस 25 ई.सी. 10 मि.लि. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
     कपाशीवरील रोग हा ओलिताखालील (मे लागवड) पुर्व मान्सून कपाशीमध्ये शेतक-यांच्या शेतावर पहाणी अंती दहीया या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. सद्यास्थितीत ढगाळ वातावरण व सतत येणारा पाऊस तसेच वातावरण पुढील कालावधीत राहिल्यास या रोगाची लागण व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीच्या झाडावर पांढ-या रंगाचे आकार विरहीत दही शिंपडल्यासारखे लक्षणे दिसून आल्यास उपययोजना म्हणून पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी घ्यावी. त्यानंतर रोगाची तीव्रता वाढत असेल तर 10 दिवसांनी परत फवारणी करावी. पावर स्पेअर ने जर फवारणी घ्यायची असेल तर पाण्याचे प्रमाण कायम ठेवून औषधाचे प्रमाण तीन पट करावे.
                           00000

No comments:

Post a Comment