Tuesday 26 June 2012

समाजातील गरीब व दूर्बल घटकापर्यन्‍त योजनांचा लाभ पो‍हचवा -राजेंद्र मुळक


   
                                                      
* सामाजिक न्‍याय दिन उत्‍साहात साजरा
* राजश्री छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन
* गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार, शिष्‍यवृत्‍तीचे वाटप
* घरकुल योजनेच्‍या खर्चाची मर्यादा वाढविणार

वर्धा दि.26- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी उपेक्षितांना न्‍याय व समाजा‍तील दुर्बल घटकांना समानतेची वागणूक देवून राज्‍याला सामाजिक समतेचा विचार दिला. त्‍यांच्‍या या महान कार्याची प्रेरणा घेवून राज्‍यात विविध कल्‍याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु करुन समाजातील गरीब व दूर्बल घटकापर्यन्‍त  विविध  सामाजिक योजनांचा लाभ पोहचवा असे आवाहन पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांनी आज येथे केले.
            राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्‍मदिन सामाजिक न्‍याय दिन म्‍हणून साजरा करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी प्रमुख पाहुने म्‍हणून बोलतांना  ते  बोलत होते.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय  भवन येथे आयोजित कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे,नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा परिषदेचे सभापती नंदकिशोर कंगाले,प्रा. उषाकिरण थुटे, गोपाल कालोरकर, श्रीमती निर्मलाताई बिजवे, तसेच अप्‍पर पोलीस अधिक्षक श्री. गेडाम आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
            सामाजिक समतेचा विचार समाजात रुजवितांनाच गरीब विद्यार्थ्‍यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिष्‍यवृत्‍ती देवून तसेच उच्‍च शिक्षणाच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याचे सांगतांना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, शिक्षणासोबतच रमाई घरकुल योजने अंतर्गत हक्‍काचे घर मिळवून देण्‍यासाठी  अर्थसहाय्य  करण्‍यात येत आहे.  बांधकाम साहित्‍याच्‍या किंमतीत वाढ झाल्‍यामुळे लाभार्थ्‍यांना दिल्‍या जाणा-या अनुदानात भरीव वाढ करण्‍यात येणार असल्‍याची घोषणाही यावेळी त्‍यांनी केली.
            शेतक-यांना अत्‍याधुनिक पध्‍दतीने शेती करण्‍यासाठी आवश्‍यक साहित्‍यासह सिंचनाच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून  शेतकरी बांधवांनी  योजनांचा लाभ घेवून आर्थिक व सामाजिक विकासाचे धेय्य साध्‍य करावे असे आवाहन करतांनाच राज्‍यातील उत्‍पन्‍न वाढविण्‍या सोबतच सामाजिक सहाय्याच्‍या योजनांना अधिक निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही पालकमंत्र्यांनी दिली.
            जात वैधता प्रमाणपत्र अभावी विद्यार्थ्‍यांना प्रवेशासाठी येणा-या अडचणी संदर्भात शासनाने येत्‍या तीन महिन्‍यात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याची अनुमती दिली. असल्‍याचे सांगतांना पालकमंत्री पुढे म्‍हणाले की, समाजातील दुर्बल घटकांच्‍या सर्वागिंन विकासाच्‍या नियोजनाचा लाभ पोहचविण्‍यासाठी अधिका-यांनी पुढाकार घ्‍यावा असेही त्‍यांनी सांगितले.
            पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रारंभी राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन सामाजिक न्‍याय  दिनाचे दिप प्रजवलित करुन उदघाटन केले.
          यावेळी  जिल्‍ह्यात बारावीच्‍या परिक्षेत प्रथम आलेला विपीण  भोईते  यांचेसह गुणवंत विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र व पुष्‍पगुच्‍छ देवून गौरव केला. जिल्‍ह्यात  प्रथम आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना शाहू महाराज गुणवंत शिष्‍यवृत्‍ती सावित्रीबाई फुले शिश्‍यवृत्‍ती , घरकुल योजने अंतर्गत अनुसरुन  मोटारवाहन प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र, शेतक-यांना सिंचन विहीरीचे मंजूरी आदेश तसेच मतिमंदाचे पालकत्‍व स्विकारणा-या पालकांचा गौरव यावेळी करण्‍यात आला.
            प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलतांना जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी समाजातील वंचितांना शिक्षणाच्‍या सुविधा निर्माण केल्‍यामुळे सामाजिक समतेचा विचाराचा प्रसार होत असल्‍याचे सांगितले.
              प्रारंभी समाज कल्‍याण सहाय्यक आयुक्‍त किशोर भोयर यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकात सामाजिक न्‍यायाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. प्रा. प्रविण वानखडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्‍या कार्याची माहिती दिली.
             कार्यक्रमाचे संचलन प्रा. ओमप्रकाश चांडक यांनी तर आभार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी जया राऊत यांनी मानले.
                                                            00000

No comments:

Post a Comment