Wednesday 27 June 2012


                             पाऊस आल्‍यानंतरच पेरणीला सुरुवात करा

           *    जिल्‍ह्यात सरासरी 16 टक्‍के पेरण्‍या
          *   23 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबीन
           *   28 हजार हेक्‍टरमध्‍ये कापूसाची पेरणी
    वर्धा दि.27 -आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर आदी तालुक्‍यात  पाऊस पडल्‍यानंतर पेरणीला सुरुवात झाली असली तरी  पेरणीसाठी पुरेसा  पाऊस पडेपर्यंत शेतकरी बांधवांनी  पेरणीला  सुरुवात करु नये असा सल्‍ला  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  बी.एस.ब-हाटे  यांनी  दिला.
पुरेसा पाऊस पडल्‍यानंतर 15 जुलैपर्यंत कापूस व सोयाबीन या प्रमुख पिकांची  पेरणी  करणे शक्‍य असून  उत्‍पादनामध्‍येही  फारसा फरक पडणार नाही  यासाठी  शेतीची मशागत व जमीनीची पोत व इतर बाबीही  महत्‍वाच्‍या असल्‍याचे  त्‍यांनी सांगितले.
 जिल्‍ह्यात सरासरी 16 टक्‍के पेक्षा पेरण्‍या पूर्ण झाल्‍या असून काही तालुक्‍यात पिकांच्‍या  उगवणूकीला  सुरुवात झाली आहे. अशा क्षेत्रामध्‍ये  तुषार संच असल्‍यास व पाणी उपलब्‍ध असल्‍यास संरक्षीत पाणी  द्यावेत तसेच पेरणी करताना रुंद सरीवरंभा पध्‍दतीचा अवलंब करावा. त्‍यामुळे पिकांना जास्‍त दिवस ओल उपलब्‍ध होऊ शकते असेही श्री. ब-हाटे यांनी सांगितले.
 जिल्‍ह्यात  दरवर्षी जून अखेर पर्यंत  सरासरी  148 मि.मी. पाऊस पडत असून यावर्षी 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी  याचकाळात 111 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.  त्‍यामुळे  शेतक-यांनी  पेरण्‍यांची घाई न करता पिकांसाठी  आवश्‍यक  पाऊस पडल्‍यावरच पेरणीला सुरुवात करावी अशी सुचना त्‍यांनी दिली.
                          23 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबिनचा पेरा 
सोयाबिन व कापूस या दोन प्रमुख पिकाखाली  जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून शेतक-यांनी
23 हजार 030 हेक्‍टरमध्‍ये  सोयाबिनची पेरणी  पूर्ण केली आहे. यामध्‍ये  सर्वाधिक कारंजा तालुक्‍यात 13 हजार 152 हेक्‍टर , देवळी  1 हजार 200 हेक्‍टर, आर्वी 1 हजार 700 हेक्‍टर, आष्‍टी  3 हजार हेक्‍टर  तर हिंगणघाट तालुक्‍यात 2 हजार 500 हेक्‍टर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे.
       कापूस पिकाखाली जिल्‍ह्यात 28 हजार 131 हेक्‍टरमध्‍ये पेरणी  पूर्ण झाली असून सर्वाधिक हिंगणघाट तालुक्‍यात 6 हजार 715 हेक्‍टरमध्‍ये  पेरणी   झाली आहे. वर्धा  4 हजार 160 हेकटर, देवळी 3 हजार 800 हेक्‍टर, आर्वी 3 हजार 88 हेक्‍टर , आष्‍टी 5 हजार हेक्‍टर , कारंजा 3 हजार 439 हेक्‍टर व समुद्रपूर तालुक्‍यात 933 हेक्‍टरमध्‍ये कापसाची पेरणी झाली आहे.
                            जिल्‍ह्यात  सरासरी 102 मि.मी. पावसाची नोंद
            जिल्‍हयात  पावसाने  हजेरी लावल्‍यानंतर  26 जून पर्यंत 102 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यामध्‍ये  सर्वाधिक 175.03 मि.मी. पाऊस हिंगणघाट तालुक्‍यात पडला आहे.
आर्वी 173.05 मि.मी., आष्‍टी  55.08 मि.मी., कारंजा 87.06 मि.मी., वर्धा 58.02 मि.मी., देवळी 66.04 मि.मी., सेलू 44 मि.मी. , समुद्रपूर 156.05 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील  चार पाच दिवसापासून पावसाने  खंड दिल्‍यामुळे  पाणी उपलब्‍ध असल्‍यास शेतक-याने ज्‍या  क्षेत्रात पेरणी  केली आहे त्‍या क्षेत्रात स्‍‍प्रींकल पध्‍दतीने संरक्षीत पाणी द्यावे. असे आवाहन   जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  श्री. बि.एम. ब-हाटे यांनी केले आहे.
                                                              0000000

No comments:

Post a Comment