महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.20 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.20-शैक्षणिक क्षेत्रातील वैद्यकीय व अभियांत्रीकी क्षेत्रामध्ये सामायीक स्पर्धा परिक्षेला अधिक महत्व प्राप्त झाले असून, उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्राविण्य प्राप्त करता येते. स्पर्धात्मक परिक्षेत समाजातील विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यासाठी तसेच त्यांचे उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परिक्षा केंद्र उघडावे, असे आवाहन पर्यावरण व सांस्कृतीक विभागाचे मंत्री संजय देवतळे यांनी केले.
हिंगणघाट येथे काल कलोडे खैरे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित समाज भुषण , समाजातील ज्येष्ठ नागरीक व 10 व 12 वी वर्गात प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष पदी उषाकिरण थुटे, समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमतराव चतूर, प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर, प्रा.रमेश बोभाटे, प्रा.अमृतराव लोणारे व शकुंतला झाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना वाकुडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात असलेले शैक्षणिक विषय निवडण्याची पालकांनी मुभा द्यावी. त्यांना शिक्षणात ज्या क्षेत्राची आवड असेल ते क्षेत्र निवडण्यास प्रोत्साहन दिले पाहीजे.समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देवून, त्यांचे भविष्य घडविण्याचे पुण्य कार्य करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी अध्यक्ष पदावरुन बोलताना थुटे म्हणाल्या की, पावसाळ्यात शेतीची कामे असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील असंख्य समाज बांधव अश्या कार्यक्रमापासून वंचित राहतात याकरिता पुढील वर्षापासून हा कार्यक्रम हिवाळ्यात घेण्यात यावा. अशी अपेक्षा करुन त्या म्हणाल्या की, ग्रामीण विकास संस्थेने समाजातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेचे केंद्र उघडले असून, त्याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नेत्रदिपक कामगीरी करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी भाऊसाहेब थूटे, प्रा.बोभाटे,चतूर, लोणारे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी श्रीमती थुटे यांच्या हस्ते पर्यावरण मंत्री देवतळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्प व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. समाज भुषण म्हणून बोभाटे व सभापती चतुर यांचा तसेच दहावी व बारावी वर्गात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुष्प व मान चिन्ह देवून पर्यावरण मंत्री देवतळे यांच्या हस्ते सत्कार करुन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यात अतुलनीय कार्य केल्याबाबत ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचलन उमेश ढोबळे यांनी केले. प्रास्ताविक वसंत पाल व आभार गजानन नांदूरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने प्रतिष्ठीत नागरिक व आबालवृध्द, महिला उपस्थित होत्या.
00000
No comments:
Post a Comment