Tuesday 16 August 2011

एका मुलीवर शस्त्रक्रिया करणा-या महिलाचा पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.16 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––       
     वर्धा,दि.16- मुलांच्या हव्यासापोटी समाजात आजही स्त्रीभृण हत्या केली जात आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी होत आहे. याला अपवाद म्हणून येथील सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या एका मुलीवर शस्त्रक्रिया करणा-या महिलाची संख्या अधिक असून, त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतूक करुन, पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी त्या महिलांना साडी व चोळी देवून त्यांचा सत्कार करुन गौरव केला.
     स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहर्तावर येथील सामान्य रुग्णालयाला भेट देवून पोषण आहार विभाग, रक्त घटक विलगीकरण विभाग, माता व बालक विभाग, नवजात शिसु अती दक्षता विभाग, टेली मेडीसीज व सिटी स्कॅन विभागाची पाहणी केल्या नंतर त्यांनी अपंग व्यक्तींना साहित्याचे वितरण केल्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     यावेळी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, जि.प. सभापती मोरेश्वर खोडके, मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे व सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.म.गडकरी आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
     सामाजिक कार्यात आरोग्य सेवा महत्वाची समजल्या जात असल्याचे नमूद करुन, पालकमंत्री मुळक म्हणाले की, रुग्णांची सेवा करताना रुग्णालयातील अनेक घटकांचा यात समावेश होत असतो. या घटकांनी प्रामाणिकपणाने आपल्या कर्तव्याचा निर्वाह केल्यास रुग्णालयाची प्रतिष्ठा वाढत असते. या रुग्णालयात अत्याधूनिक सयंत्र बसविलेली असून, त्याचा वापर रुग्णांच्या अचूक निदानासाठी करता येतो. त्यानुसार रुग्णावर उपचार करता येतो. ही सर्व आरोग्य सेवा  सामाजिक व्रत वैद्यकिय अधिका-यांनी स्विकारण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.        
राज्य व केंद्र शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य संस्थेच्या बळकटी करणासाठी विविध योजने अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिलेला असून, याचा उपयोग सर्वसामान्य लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झाला पाहीजे.वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य संस्थेवर येणारा भार दूर होण्यासाठी जिल्ह्याचा बृहत आराखडा तयार करण्यात येणार असून, जिल्ह्यातील लोकप्रतीनिधींच्या अभिप्राया नंतर आरोग्य केंद्र कुठे असायला पाहीजे, याची माहिती तातडीने देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीचा उपयोग नाविन्यपूर्ण कार्यासाठी खर्च करण्यात यावा, यासाठी आवश्यक ती मदत केल्या जाईल, असे सांगून ते म्हणाले की,रुग्णालयातील वीज फिडरचे कार्य येत्या आठवडयात सुरु केल्या जाणार असून, जिल्ह्यातील रुग्णालयात विशेषज्ञ वैद्यकीय अधिका-यांचे आवश्यक असलेली पदे आरोग्य मंत्र्याशी चर्चा करुन सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
     याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी भोज म्हणाल्या की, शासन आरोग्य यंत्रणेला पुरेसा निधी देत असून, रुग्णांची काळजी घेऊन त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार व निदान करणे हे आरोग्य विभागाचे महत्वाचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय विमा योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी तसेच आरोग्य यंत्रणेने गोर गरीब व दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य करावे, असेही त्ते म्हणाले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रावखंडे यांनी केले तर संचलन डॉ.जयचंद मुन यांनी केले. आभार डॉ. धामट यांनी मानले. याप्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ. शर्मा, डॉ. राज वाघमारे व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                        000000
    
    

No comments:

Post a Comment