Saturday 20 August 2011

सामाजिक भ्रष्टाचार स्त्री भ्रुण हत्या !


विशेष लेख                 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.20 आगस्ट 2011                          

     स्त्रीभ्रुण हत्या हा सामाजिक भ्रष्टाचार आहे. यामुळे येणा-या काळात समाज व्यवस्था बदलेल असं संकट निर्माण झालय. हा भ्रष्टाचार निपटून काढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. यासाठी सजगपणे प्रत्येकाने हे प्रकार रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. याबाबत थोडसं. 
                                - प्रशांत दैठणकर
 येणा-या काही वर्षांनी लग्नासाठी जोडीदार न मिळाल्यानं लग्न करता आलं नाही अशी वेळ मुलांवर येणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. याचं गांभिर्य समाजानं जाणून घ्यायला हवं 2011 च्या नव्या आकडेवारीत जनगणना हेच सांगत आहे. काही ठिकाणी मुलींच्या जन्माचं प्रमाण 930 तर काही ठिकाणी ते 916 पर्यंत खाली घसरलय.
मुलगा म्हणजे सगळ्या घराचा वारस, वंशाचा दिवा अशी धारणा आपणाकडे रुजली असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. काही प्रांतात मुलगी झाली तर लगेच तिला मारुन टाकलं जातं तर काही भागात मुलगी होवू नये यासाठी सोनोग्राफी यंत्राचा आधार घेतला जातो. स्त्रीभ्रुण हत्या ही समस्या गेल्या काही काळात प्रकर्षानं समोर आली आहे.
कोणतही तंत्रज्ञान म्हणजे फायद्याचं असं कधी होत नाही. अणुच्या शक्तीतून वीज निर्माण करता येते.  मात्र हे तंत्रज्ञान वापरुन अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवला. दुस-या महायुध्दात हा प्रकार घडला. मातेच्या पोटात गर्भ निकोप आहे का, त्याची वाढ व्यवस्थित होते की नाही   याची   तपासणी सोनोग्राफीत अपेक्षित आहे. मात्र पैशाच्या लालचेने याचा गैरवापर करुन गर्भलिंग चिकित्सा करणारेही आपल्या आसपास आहेत. आणि अणुबॉम्ब पेक्षा गंभीर प्रकार ते करीत आहेत याचीही समाजाने जाणीव ठेवायला हवी.
मुलीला वंशाचा दिवा मानलं जात नसलं तरी वंश जर वाढवायचा तर घरात सून म्हणून मुलगी लागणार आहे याची सर्व समाजाने जाणीव ठेवावी. वंशाच्या दिव्याच्या नादात येणा-या काळात मुलगी न मिळाल्याने वंश वाढणार नाही ही जाण समाजानं ठेवण्याची वेळ आली आहे. भ्रुण हत्या आणि गर्भजल चिकित्सा ही समाजाला लागलेली कीड आहे असंच म्हणायला लागेल. हे रोखण्यासाठी शासनाने आपल्या स्तरावर कायदे केलेले आहेत. अंमलबजावणी यंत्रणा अतिशय गांभिर्याने याकडे लक्ष दिलेले आहे मात्र सोनोग्राफी केंद्र चालक आणि नागरिक वेगवेगळ्या वाटा शोधून त्यावर मात करीत आहेत.
समाजात भ्रष्टाचार रोखला जावा यासाठी रस्त्यावर   उतरणा-या युवक-युवतींना आणि नागरिकांना या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला तर खरी जनजागृती होईल. हा समाजात वाढलेला असा भ्रष्टाचार आहे. जो येणा-या काळात समाज व्यवस्थाच संकटात आणू शकतो. प्रत्येक नागरिकाने सजगपणे या प्रकारास रोखलं पाहिजे म्हणजेच हे चित्र येणा-या काळात बदलेल.
                           - प्रशांत दैठणकर



                  000000

No comments:

Post a Comment