Thursday 18 August 2011

`रोड रेज ` वाढतोय वेगात ... !



     अपघात जे होतात त्यात यांत्रिक दोष आणि मानवी दोष यांची तुलना करताना असं आढळलं आहे की 100 पैकी 73 प्रसंगी मानवी चुकीमुळे अपघात झाले आहेत. रस्ता म्हणजे अपघात, भांडणं, वाद अशी प्रतिमा बदलण्यासाठी रस्त्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येकानं काळजी घेतली तरच याला `ब्रेक` लागणार आहे.
                                                            - प्रशांत दैठणकर

आपण वाहनांची संख्या वाढताना बघतोय त्यासोबतच संख्या वाढतेय ती अपघातांची. या अपघातांसोबतच रस्त्यावर वाहतुक विषयावरुन         झालेल्या वादातून होणाऱ्या भांडणांची संख्याही अर्थात `रोड रेज` ची संख्या वाढतेय, हा अतिशय गंभीर प्रकार आणि प्रसंगी प्राणघातक देखील ठरणारा प्रकार आहे.
रस्त्यावर संतापाच्या भरात मारामारी करणं हा स्वभावदोष आहे मात्र अशा प्रकारापासून अनेकांना प्राण देखील गमवावे लागतात ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असं म्हणावं लागेल. मुळात रागावर नियंत्रण नसणे ही एक मानसिक कमजोरी आहे. गाडीचा धक्का लागला किंवा ओव्हरटेक करायला जागा दिली नाही अशा क्षुल्लक कारणांवरुन देखील वादावादी होत असते.
वाहन चालवताना आपण योग्य ती काळजी घेतल्यास आपणास अशा प्रकारांपासून दूर राहता येईल. इंग्रजांनी `सॉरी` सारखा सुंदर शब्द आपल्याला दिलाय आपली चूक झाली तर आपण माफी मागणं शिकलं पाहिजे. चुकीचं समर्थन करणं किंवा माफी मागणं हे अपमानास्पद समजणं यातून असे वाद वाढत असतात. वादाचा प्रसंग निर्माण होण्यापूर्वीच मिटवता आला तर फायदा दोघांचा होतो हे लक्षात घेतलं पाहिजे.
                                                                                    रस्ता हा सर्वांचा आहे याचं भान ठेवून आपण रस्त्यावर वावरलं पाहिजे. आपली भाषा देखील आपण चांगल्या प्रकारची ठेवली तर आपण अशा प्रसंगी होणारे वाद टाळू शकतो. समोरच्या व्यक्तीची चूक आहे अशा स्थितीत ती व्यक्ती माफी मागते त्यावेळी माफी देण्याइतकी क्षमाशिलता असावी तेव्हढं मन मोठं असावं हे देखील आवश्यकच आहे.
साधारणपणे सोबत युवती असेल तर युवक आपला मोठेपणा मिरवण्यासाठी आणि ताकद दाखवून देण्यासाठी असे रस्त्यावर वाद घालतात. अरे बाबा फुशारकी मारताना त्यासाठी प्राणाचं मोल देणं योग्य नाही. भांडण-मारामारीत अपंगत्व आलं तर आयुष्य पंगू होईल आणि दवाखाना पोलिस असं चक्र मागे लागेल अशी जाणीव पालकांनी मुलांना करुन दिली पाहिजे.
प्रत्येक बाब स्वत: अनुभव घेऊन शिकण्याची गरज नाही. काही बाबतीत इतरांना आलेले अनुभव काय शिकवतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं आणि स्वत:ला शिस्त लावली तरच हे प्रकार थांबतील.
आपण एकटेच नाही आपल्यामागे परिवार असतो, ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेचं नाव देखील आपल्या पाठीशी असतं याची जाणीव प्रत्येकानं सातत्याने मनात राखली तर आपण वादाचे असे प्रसंग टाळू शकतो कारण आपल्या वागणुकीमुळे कुटुंब आणि संस्था यांचीही बदनामी होते हानी होत असते. आपल्या घरी वाट बघणारं कुणी आहे ही जाणीव आपल्याला अशा प्रसंगापासून दूर ठेवत असते.
-प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment