Monday 15 August 2011

नविन्यपूर्ण योजनांमधून विकास-पालकमंत्री - मुळक


स्वातंत्र्याचा 64 वा वर्धापनदिन वर्धेत उत्साहात
           
     वर्धा, दि. 15 :- वर्धा जिल्ह्यात नविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून प्रशासन तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे नियोजन आहे आजपासून जल अभियान, जमिनीचे फेरफार अभियान, विधवा वृध्द दांपत्याना आशेचा किरण अभियान, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उज्जवल शिक्षणाच्या संधी आदी  नविन्यपूर्ण अभिआन सुरु करण्यात येत आहेत अशी घोषणा वित्त व नियोजन तसेच ऊर्जा राज्यमंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी स्वातंत्र्य दिनी केली.


     भारतीय स्वातंत्र्याच्या 64 व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी जिल्हाधिकारी जयश्री भोज तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
     या दिमाखदार सोहळयास खासदार दत्ता मेघे, आमदार सुरेश देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, पोलीस उप अधिकक्षक यु.ए.जाधव, नळे, उपविभागीय अधिकारी संजय दैने, धार्मिक तसेच निवासी उपजिलहाधिकारी राजेश खवले आदींचीही उपस्थिती होती.
     राज्याच्या नियोजन विभागाकडून जिल्हा विकासासाठी देण्यात आलेला निधी वापरण्यात वर्धा जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आहे याचा उल्लेख पालक मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
     या प्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, पावसाचा अनियमीतपणा यावर्षीही दिसून येत आहे. जिल्ह्यात पडणारा पाऊस एकूण पावसाच्या तुलनेत कमी झाला असून, अद्यापही पावसाने आतापर्यंतची सरासरी गाठली नाही. याचा परिणाम  जिल्ह्यातील जलसाठ्यावर होणार असून, येणा-या भविष्य काळात लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासाठी जनतेने आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन त्यांनी केले.
     खरिप हंगामाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, खरीप पिकांमध्ये 4 लक्ष 6 हजार 975 हेक्टर शेती क्षेत्रावर म्हणजे 99 टक्के पेरणी झालेली असून, त्यामध्ये कापूस 1 लाख 62 हजार 380 हेक्टर, सोयाबिन 1 लाख 72 हजार 980 हेक्टर, तर 64 हजार 480 हेक्टर व इतर 7 हजार 135 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सध्या पिकाची उगवण व वाढ समाधान कारक असून, ज्या ठिकाणी किडीचा अल्प प्रार्दूभाव आहे अश्या ठिकाणी शेतक-यांना कृषी विभागाकडून उपाययोजनेबाबत  मार्गदर्शन करणे सुरु आहे.
     या हंगामासाठी 1 लक्ष 20 हजार 099 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून त्यामध्ये सोयाबिनचे 1 लाख 10 हजार 500 क्विंटल, कापूस 8 लक्ष 93 हजार पाकीटे, तूर 4 हजार 700 क्विंटल व इतर पिकाच्या बियाणाचा समावेश आहे. विदर्भ पॅकेज अंतर्गत महाबिज मार्फत 36 हजार 939 क्विंटल सोयाबिन, 2500 क्विंटल तूर बियाण्याचे वितरण 50 टक्के अनुदानावर शेतक-यांना करण्यात आले आहे. असेही पालकमंत्री म्हणाले.
     जिल्ह्याला 66 हजार 778 मे.टन रासायनिक खताचा पुरवठा झालेला असल्यामुळे शेतक-यांना आवश्यकतेनुसार रासायनिक खत उपलब्ध आहे.जिल्ह्याला खरीप पिकासाठी 438 कोटी 57 लक्ष रुपयाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 46 हजार सातशे एकोणचाळीस शेतक-यांना 238 कोटी रु. चे पीक कर्ज वाटप करण्यात आले.
     सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजने अंतर्गत मंडळ स्तरावर  समाधान योजना राबविण्यात येत असून, आतापर्यंत 51 हजार 755 विविध प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदणी, सातबारा प्रमाणपत्र ,शिधा पत्रिका वाटप,रोजगार हमी योजनेच्या कामांचा समावेश आहे. याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
     सिंचनासाठी वर्धा जिल्ह्याला वरदान ठरणा-या निम्न वर्धा प्रकल्पाची सिंचन क्षमता 65 हजार 025 हेक्टर आहे. आतापर्यंत 15 हजार 379 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचन उपलब्ध झाले असून, मुख्य कालवे व वर्धा नदीवर बॅरेजची कामे व वितरण प्रणालीचे कार्ये प्रगतीपथावर आहेत. तसेच 26 गावांचे पूर्नवसन झाले आहे. अशी माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.
     शेतक-यांच्या विहिरीवरील  कृषिपंप  जोडणीचे मार्च 2011 अखेर 2 हजार 560 अर्ज प्रलंबित होते. येत्या आर्थिक वर्षात  संपूर्ण कृषिपंपाना वीज जोडणीचे कामे़ पूर्ण करण्यात येईल. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 14 हजार 730 कुटूंबाच्या घरांना पुरवठा देण्यात आला आहे. असेही ते म्हणाले.
     पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सामाजिक वनिकरण विभागामार्फत 217 हेक्टर क्षेत्रावर 3 लक्ष 17 हजार 150 रोपांची  लागवड करण्यात येत असल्याचा उल्लेख पालकमंत्री मुळक यांनी केला.
ग्रामीण क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 5 हजार आठशे चार बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यापेकी 3637 गटांना विविध आर्थिक उपक्रमासाठी खेळते भांडवल व बिज भांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 2011-12 मध्ये 2 हजार 371 घरकुलांचे उद्दिष्टापैकी 1 हजार 847 घरकुलांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत व तालुकास्तरावर भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र भवन बांधण्यासाठी आठ पंचायत समिती अंतर्गत 28 ग्रामपंचायतींची निवड झाली असून 7 ग्रामपंचायतीमध्ये सेवाकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात 40 गावाची निवड करण्यात आली आहे.
     महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीमे अंतर्गत यावर्षी 205 गांवे पात्र झाली आहेत. अशीही माहिती पालकमंत्र्यानी दिली.
     समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी चालू वर्षासाठी ग्रामीण भागाकरीता 1500 व नगरपालिका क्षेत्राकरीता 60 घरकूलाचे उद्दिष्ट दिले असून, घरकुलांचे कार्य प्रगतीपथावर आहे.
     याप्रसंगी विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त शेतकरी, अधिकारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन केसरीमल कन्या विद्यालयाच्या ज्योती भगत, आयुर्विमा महामंडळाच्या स्वाती देशपांडे तसेच न्यू इंग्लीश स्कूलचे अजय येते यांनी केले. विकास भवन येथे झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमाने या सोहळयाची सांगता झाली. 

No comments:

Post a Comment