Saturday 16 July 2011

कोठेकर कुटूंबियांना प्राधान्यक्रमाने शासकिय योजना लाभ देण्यात येईल - पालकमंत्री

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.16 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
         वर्धा,दि.16 - सेलू तालुक्यातील देऊळगांव येथील शेतकरी विठ्ठल कोठेकर यांनी 10 ऑक्टोंबर 2010 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांचे कुटूंब अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे ते अल्पभूधारक असल्यामुळे त्यांच्या कुटूबियांना प्राधान्य क्रमाने शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यात येईल,अशी ग्वाही वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
याप्रसंगी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, पंचायत समिती सेलूचे सभापती निलिमाताई दंडारे, मुख्य कार्यपालन अधिकारी लिनाताई बन्सोड , पंचायत समिती सदस्य बालेश मोरवाल,उपविभागीय अधिकारी धार्मिक, तहसिलदार गावीत, कृषि विभागाचे व पंचायत समितीचे अधिकारी  उपस्थित होते.
          स्व. विठ्ठल कोठेकर यांचे वय 48  होते, त्यांच्यावर विविध कार्यकारी संस्थेचे 9 हजार 500 रुपये कर्ज होते. त्यांच्याकडे 2 एकर जमीन आहे. स्व.कोठेकर यांना दोन मुली व एक मुलगा असून,म्हातारे वडील किसनजी कोठेकर आहे. त्यांची एक मुलगी रेखा शिकत असून, सचिन मुलाच्या  एका हाताला त्रास असल्याचे त्यांच्या पत्नी रेखा कोठेकार यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. यावर पालकमंत्री म्हणाले की, मुलीच्या शिक्षणात खंड पडणार नाही. याची खबरदारी घेण्यात येणार असून, मुलीच्या भविष्यातील शिक्षण आपण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सचिन  यांच्या हाताला होणा-या त्रासावर औषधोपचार  व उपचार करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक,वर्धा यांच्याकडून तपासण्या  करुन घेण्यात याव्या असे  आदेश दिले. या कुटूंबाला कृषी विभागाकडून शेततळे मिळाले असून, शासनाकडून विहीरीचे बांधकाम करुन देण्यात येईल. कुटूंबातील वडीलांना  संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे तसेच त्यांच्या नावाने जमिनीचे फेरफार करण्याचे यावेळी निर्देश दिले.रेखा कोठेकर यांना विविध कार्यकारी सोसायटीतून 50 हजाराचे कर्ज मंजूर करण्याचे  निर्देश देवून जुने कर्ज त्यातून वसूल करण्यात यावे अश्या सुचना दिल्या.
आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासनाकडून 13 जानेवारी 2011 रोजी 1 लक्ष रुपये देण्यात आले असून, काही रक्कम अल्प बचतीमध्ये गुंतविण्यात आले आहे. अत्यंत भावूक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्र्याचे हस्ते शेतीच्या उपयोगासाठी स्प्रेपंप व रासायनिक खतांची पिशवी यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
                                 000000

No comments:

Post a Comment