Thursday 20 October 2011

गरज वैज्ञानिक विचारांची




            विज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. असं असून देखील आपण विज्ञानाबाबत सजग नाहीत. एकाच वेळी 18 व्या आणि 21 व्या शतकातला आपला देश. चांद्र्यान बघायला आम्ही बैलगाडीतून जातो. जगात एक महासत्ता म्हणून उभं राहण्यासाठी विज्ञानाप्रती जाणीवा बदलण्याची वेळ आली आहे.                                                  -    प्रशांत दैठणकर

        आज आपण धावपळीच्या युगात आहोत आणि आपल्या आसपास यंत्रांचा गराडा पडला आहे. केवळ असा गराडा नव्हे तर ही यंत्र आज आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेत. मोबाईल असो की मोटारसायकल या सर्वांनी आपलं आयुष्य सहज बनवलं आहे. गुहेतला तो आदीमानव आजचा मानव या वाटचालीत विज्ञानाचा मोठा वाटा आहे. विज्ञानात ही यंत्र घडवली आणि मानववंशाची प्रगती शक्य झाली असच म्हणता येईल.
            गुहेत थंडीचा मुकाबला करताना दगडांच्या घर्षणानं जी ठिणगी पडली ती विज्ञानाचीही पहिली ठिणगी होती त्यानंतर मानवानं चाकाचा शोध लावला हे चाक आज प्रगतीचं चाक आहे. या प्रगतीच्या विज्ञान चक्राबाबत आपण कुतूहल ठेवावं त्याचा अभ्यास करावा हे अपेक्षित आहे. एकदा शोध लागला ते चाक पुन्हा नव्यानं शोधण्याची गरज नाही हे देखील स्पष्टच आहे.
            भारतात वैज्ञानिकांची मोठी परंपरा राहीलेली आहे. कणाद असो की आर्यभट्‌ट यांनी आपल्या संशोधनांनी जगाला आगळी दिशा दिली आहे. सर्वात प्राचीन सभ्यता म्हणून भारताचा जसा आपल्याला अभिमान आहे तसाच अभिमान विज्ञानाबद्दल हवा. आपल्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याची स्वप्नं बघणारे पालक    विज्ञानाबाबत जागरुक आहे का ?  या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे.
एखादं खेळणं आणून दिल्यावर त्याची रचना कशी आहे अशा कुतुहलापोटी ते लहान बालक त्या खेळण्याचं` डिसेक्शन `       करुन बघतं त्यावेळी त्याचं कुतुहल किती जणांना दिसतं ?खेळणं तोडलं म्हणून पुन्हा `खेळणं आणणार नाही तुला` असं  धमकावणा-या पालकांची संख्या दुर्दैवानं अधिक आहे. त्याच्या या कुतुहलातूनच त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोण लक्षात येवू शकतो आणि त्यातून त्याला आवड निर्माण झाली तरच इंजिनिअरिंग अथवा मेडिकलचं शिवधनुष्य त्याला पेलता येणं शक्य होईल हे आपण ध्यानी घ्यावं.                                                                 
                         विमान आकाशात कसं  तरंगतं ?, पक्षी उडू शकतात तर आपण का नाही ? रेडिओत छोट्याशा जागेत माणूस कुठे बसत असेल ? टि.व्ही.त दिसणारे चेहरे टिव्हीच्या मागे उभे असतात का ? हे सारे प्रश्न आपणास बालपणी पडले होतेच ना पण आपल्या पाल्यानं तोच प्रश्न विचारला तर त्याला विमानतळावर नेणारे किंवा रेडिओ स्टेशनवर घेऊन जाणारे किती असतात ?  त्यांना बावळटपणाचे प्रश्न म्हणून झटकलं तर मुल देखील पुढच्यावेळी भितीपोटी कुतुहल दाबून टाकतो आणि आपणच सोपी गोष्ट अवघड करुन टाकतो.
            कुतूहल ही वैज्ञानिक दृष्टीकोणाची पहिली पायरी असते त्याची उकल झाल्यावर पुन्हा कुतूहल निर्माण होणं ही पुढच्या प्रवासाची सुरुवात असते. यात आपणच ठरवायचं की जबाबदार पालक व्हायचं की मुलांवर जबाबदारी ढकलायची  ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
            विज्ञानाच्या कक्षा आता खूप रुंदावल्या आहेत. अंतराळ विज्ञान, हवाई विज्ञान, समुद्री विज्ञान, वैद्यक शाखा, यांत्रिक शाखा, रसायन विज्ञान, भौतिक विज्ञान तसेच विज्ञान-तंत्रज्ञान, जीव विज्ञान अशा अनेक शाखा आहेत आणि प्रत्येक शाखा वेगळा अभ्यास आणि अनुभूती तसेच आनंद देणारी पण तिथवर मुलांना नेता 100 मार्कांचा विषय या संकुचित दृष्टीकोणातून आपण पाल्याचं क्षेत्र मर्यादीत करत तर नाही ना ? असं प्रत्येकानं स्वत:ला विचारावं.
            विख्यात अणूशास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम हे विज्ञानाचा अभ्यास करुनच देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले असं ठसठशीत उदाहरण समोर असतानाही भारतीयांनी विज्ञानाकडे डोळसपणे बघितलं नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं एकीकडे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मनुष्यबळ अपुरं पडतय आणि दुसरीकडे बेरोजगारांच्या रांगा हटत नाहीत अशी परिस्थिती आहे.
            देशाचं पहिलं चांद्रयान उडणार आहे हे पाहण्यासाठी आपला देश अभिमानानं बैलगाडीतून जातोय इतका मोठा विरोधाभास आहे. आम्ही आजही एकाचवेळी 18 व्या आणि 21 व्या शतकात जगतोय कारण आमची विज्ञानाबाबत अनास्था हेच आहे.
            अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान सारख्या देशात जी संपन्नता आली ती निश्चितपणे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे आली आहे आणि आपल्यालाही प्रगत आणि संपन्न व्हायचय, जगातील एक महाशक्ती व्हायचंय तर आपणही या विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे.                                - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment