Saturday 30 July 2011

कारंजा तालुक्यातील पिक परिस्थीतीची पाहणी व शेतक-यांसोबत संवाद


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
      वर्धा, दि. 30- कारंजा तालुक्यातील हेटीकुडी व चंदेवाणी या ग्रामीण क्षेत्रातील शेतक-यांच्या शेतातील पिक परिस्थिती आणि फळबागेची पाहणी नुकतीच (दि.26जुलै) जिल्हा कृषि अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, सेलसुरा कृषि केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे व तालुका कृषि अधिकारी जुमडे यांनी प्रक्षेत्राला भेट दिली व शेतक-यांसोबत संवाद साधला.
कारंजा तालुक्यातील हेटिकुंडी येथील केशवराव भवते यांच्या संत्रा फळबोगेला भेट देवून पाहणी करताना त्यांना येणा-या अडी-अडचणीसंबधी प्रक्षेत्रावर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भवते म्हणाले की, संत्र्याचे फळबागाची लागवड 2003 मध्ये करण्यता आली. चार एकरामध्ये संत्र्याचे 850 झाडे लावण्यात आले. लागवड केल्यापासून आतापर्यंत फळबागाच्या व्यवस्थापनावर     12 लाख रुपये खर्च झाले. त्यामध्ये ठिंबक सिंचन व विहीरीचा खर्च अंतर्भुत आहे. मात्र 2007 पासून रसाळ व स्वादिष्ट संत्र्याचे उत्पादन झाले. 2007 साली 1 लाख 82 हजार, 2008 या वर्षी 2 लाख   50 हजार , 2009 या वर्षी 3 लाख 75 हजार, 2010 यावर्षी    45 हजार रुपयाचा खरेदीचा व्यवहार झाला असून,2011 मध्ये संत्र्याचा संपूर्ण बागाच्या खरेदीचा व्यवहार 8 लाख 25 हजार रुपयाचा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आंबीयाबाहार, मृग बाहार व हस्त बाहाराची विस्तृतपणे माहिती दिली. यावर संत्रा फळबागाच्या किड व्यवस्थापनाबाबत अधिका-यांनी त्यांना मार्गदर्शन केले.              यानंतर चंदेवाली येथील निलेश घोडमारे यांच्या शेतातील पीक परिस्थितीची पाहणी करुन संत्रा फळबागाला भेट देण्यात आली. चंदेवाली येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सायंकाळी 5 वाजता शेतक-यांसाठी मार्गदर्शन  बैठक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कृषि अधिक्षक ब-हाटे म्हणाले की, शेतक-यांना पिकाच्या नुकसान भरपाई आवश्यक आहे की, शेतीच्या निगडीत साहित्याची आवश्यकता आहे किंवा शेतक-यांना  तंत्रशुध्द तंत्रज्ञानाचया मार्गदर्शनाची गरज आहे यावर शेतकरी म्हणाले की, आम्हाला शेतीच्या माहितीपूर्ण नवनविन तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ही माहिती शेतक-यांसाठी मोलाचा अनमोल ठेवा असतो. पीक प्रक्रियेत व उत्पादन वाढीसाठी माहितीपूर्व नवनवे तंत्रज्ञान शेतीसाठी सहाय्यभूत ठरत असते.
शेतक-यांशी संवाद साधताना डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले की,  शेतक-यांचे मुख्य पीक कपासी, सोयाबीन, तुर,फळ पीक संत्रा यावर येणारे रोग, किडी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मृद व जल संधारण व निचरा व्यवस्थापन , तण नियंत्रण याबाबत सखोल चर्चा होऊन  शेतक-यांचे शंकासमाधान करण्यात आले.
अधिक माहिती देतांना नेमाडे म्हणाले की, सद्यास्थितीमध्ये कपासी पिकावर रस शोषन करणा-या किडीचा व सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव अत्यल्प आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या किड किंवा किटकनाशकाची फवारणी करु नये व फवारणीवर होणारा अनावश्यक खर्च टाळावा. त्याचप्रमाणे या किडीविषयी जागरुक राहून किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास रस शोषण करणा-या किडींसाठी व चक्रभुंग्यासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा अॅसिटामीप्रीड 20 टक्के प्रवाही 2 ग्रॅम किंवा मिथाईल डेगॅटॉन 25 टक्के प्रवाही 8 मिली यापेकी कोणतेही एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
त्याचप्रमाणे सोयाबीन पीकावरील हिरव्या उंट अळीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 10 मिली यापेकी एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. निव्वळ किटकनाशकावर अवलंबून न राहता एकात्मिक किड व रोग नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी संवाद करताना सांगितले.
यावेळी शेतक-यांच्या पीक प्रक्रियेबाबत येणा-या अडचणी व समस्यांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच इंगळेताई उपस्थित होत्या.
यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
                           00000







No comments:

Post a Comment