Wednesday 27 July 2011

सोयाबीन पिकावरील ऊंट अळीच्या रोगावर उपाययोजना


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.27 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
 वर्धा, दि. 27- सोयाबिन, कपाशी, तूर पिकावरील किड रोगाची निरिक्षणे व सल्ला प्रकल्प सुरु आहे. या माध्यमातून शेतक-यांना किडीची ओळख व त्याचे व्यवस्थापन कसे करावे या बाबत एस.एम.एस. व्दारे शेतक-यांना सल्ला व माहिती देण्यात येते. सोयाबिन वरील ऊंट अळीची ओळख, जिवनक्रम नुकसानीचा प्रकार व एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत उपाय योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.
किडीची ओळख अंतर्गत ऊंट अळीचा पतंग तांबड्या रंगाचा असून, त्याचे पुढील पंखावर वैशिष्टपूर्ण असा सोनेरी पिवळ्या रंगाचा त्रिकोणात्मक भाग असतो. मागील पंखाचे किना-यावर गर्द ठिपके असतात. पंखाचा विस्तार 38 ते 40 मि.मि. असतो. मादी पतंग रात्रीचे वेळी गोलाकार व पिवळसर एक,एक अंडी मागील पृष्ठ भागावर घालते. एक मादी पतंग सतत पाच दिवस दररोज 40 अंडी घालते.
किडीचा जीवनक्रम नुसार ऊंट अळीची अंडी अवस्था दोन ते चार दिवसाची असते. पतंग अवस्था सहा ते सात दिवसाची असते. पुर्ण वाढलेली अळी शरीराचा मधला भाग उंच करीत चालते. ती जवळपास 33 मि.मि. लांब व पाच मि.मि. रुंद व फिक्क्ट हिरव्या रंगाची असते. अळी अवस्था सोळा ते तेवीस दिवसाची असते. अळी पानाची घडी करुन पांढ-या वेष्टनात कोषाअवस्थेत जाते. व कोश जवळपास 20 मि.मि. लांब असतो. कोषअवस्था 6 ते 7 दिवसाची असते. अशा प्रकारे या किडीला
1 पिढी पूर्ण करण्यास 30 ते 35 दिवसाचा कालावधी लागतो.
     लहान अळ्या सुरुवातीला पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व जाळीदार करतात. मोठ्या अळ्या पाने खावून फक्त शिराच शिल्लक ठेवतात. तीव्र प्रादुर्भाव असल्यास झाडे पर्णहिन होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अळ्या फळधारणा होणारा भाग फुले व शेंगा खातात. कमी तापमान व जास्त पाऊस या किडीच्या वाढीस अनुकूल असतो.
किडीच्या व्यवस्थापनमध्ये पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारसीप्रमाणे वापरावे. नत्र युक्त खताचासमतोल वापर करावा. पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत पिक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणा-या किडीच्या पुरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा.
आंतर मशीगती अंतर्गत ऊंट अळी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंदणी व कोळपणी वेळेवर  करावी. पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षी थांबे उभारावेत. शेतात नियमित सर्व्हेक्षण करावेत. जेथे आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे चार अळ्या  प्रती मीटर ओळीत पिक फुलावर असताना किंवा तीन अळ्या प्रती मीटर ओळीत शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना व त्यापेक्षा जास्त अळ्या आढळल्यास क्लोरोपायरीफॉस 20 टक्के, 20 मि.ली. किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के, 20 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के, 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी पानाच्या खालच्या बाजूने जाईल याची काळजी घ्यावी. सदरहु उपाययोजना सामुहीक रित्या करणे गरजेचे आहे.असे संतोष डाबरे,उपविभागीय कृषि अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
                       00000

No comments:

Post a Comment