Saturday 30 July 2011

सोयाबिन पिकावरील चक्रीभुंग्याचे एकात्मिक किड व्यवस्थापन


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.30 जूलै  2011
----------------------------------------------------------------------------------
           वर्धा, दि.30-  जिल्ह्यातील वर्धा,सेलु,देवळी तालुक्यामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला आहे. या किडीचे जीवनकाळ नुकसान पातळी व एकात्मिक व्यवस्थापन या अनुषंगाने शेतक-यांनी किडीची ओळख व व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावी, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
      सोयाबिन पिकावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव साधारणत: ऑगस्ट महिन्याच्या पहील्या आठवड्यापासून सुरु होतो. चक्रीभुंग्याची अळी तसेच प्रौढवस्था पिकाचे नुकसान करते. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करुन त्यामध्ये अंडी घालतात. त्यामुळे अन्नपुरवठा कमी होतो आणि खापाच्या  वरचा भाग वाळुन जातो. अळ्या देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहचतात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही किड उडीद, मुंग, चवळी, वाल, तुर, भूईमुंग, मिरची, कारली इत्यादी पिकाचेही नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव पीक दिड ते दोन महीन्याचे अवस्थेत असताना झाल्यास किडग्रस्त झाड इतर सामान्य झाडासारखेच दिसतात. त्यामुळे पीक दिड ते दोन महीन्याचे अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास किडग्रस्त झाड इतर सामान्य झाडासारखेच दिसतात. त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. नंतरच्या काळात वरील खापेवरील फांदी वाळलेली दिसते.साधारणत: लवेर पेरलेल्या सोयाबिनवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.
किडीच्या ओळखीनुसार किड ही प्रौढ भुंगेरा फिक्क्ट तपकिरी रंगाचा 7 ते 10 मि.मि. लांब असते. मादी नरापेक्षा मोठी असते. स्पर्शेंद्रिये शरीराच्या लांबी एवढे किंवा त्याहीपेक्षा लांब असतात. पंखाचा शरीरातील अर्धा भाग गर्द काळा असतो. मादी 8 ते 72 अंडी घालते. अंडी घालण्याचा काळ 8 ते 34 दिवसांचा असतो. अंडी अवस्था 4 ते 8 दिवस असते. अंडी पिवळसर पांढरी व गुळगुळीत असुन, तिचा डोक्यावरील भाग जाड असतो. व तिच्या धडाच्या खालील भागावर उभरट ग्रंथी असतात. पुर्ण वाढलेली अळी 19 ते 22 मि.मि. लांब असते. अळी अवस्था 32 ते 62 दिवसाची असते. पिकाचे कापणी पुर्वी अळी फांदीचा तुकडा पाडते व आत सुप्तावस्थेत जाते. ही अवस्था ऑक्टोंबर  ते जुन-जुलै पर्यंत टिकते. अळी त्याच तुकड्यात शंखी अवस्थेत जाते. शंखी अवस्था 8 ते 11 दिवसाची असते. अळीची सुप्तावस्था मान्सुनच्या पावसामुळे संपते.
किडीचे व्यवस्थापन करताना शेतक-यांनी घ्यावयाच्या दक्षतेनुसार चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालु नये, याकरीता सुरवातीला 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी, सोयाबिनला फुलोरापुर्वी 3-5 चक्रीभुंगा प्रती मिटर ओळीत व फलारानंतर 5-6 चक्रीभुंगा प्रती मिटर ओळीत ही मर्यादा लक्षात घेऊन खालील किटक नाशकाची फवारणी करावी. इथोफेनप्रॉक्स 10 टक्के 1 ली. प्रती हेक्टर किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 25 मिली किंवा अॅसिफेट 75 टक्के 15 ग्रॅम किंवा फेनवलरेट 20 टक्के 10 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी किटकनाशकच्या निर्मुलनासाठी करावी, असे उपविभागीय कृषि अधिकारी,वर्धा कळवितात.
                        0000

No comments:

Post a Comment