Wednesday 1 June 2016

प्रत्येक शेतक-याला पीक कर्ज मिळेल
यादृष्टीने नियोजन करा
Ø जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या बँकांना सूचना
Ø मंडळस्तरावर कर्ज मेळावे घेण्याचे निर्देश
Ø जिल्हास्तरीय सल्लागार, आढावा समितीची बैठक
         वर्धा, दिनांक 18 –  जिल्ह्यातील सर्व पीक कर्जास पात्र असणा-या सर्व शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने  सर्व बँकांनी नियोजन करावे. त्याकरीता मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करून जनजागृती करावी. तसेच शेतक-यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा असलेला मॉन्सून पूर्व हंगाम लक्षात घेऊन 30 मेपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, अशा सुचना  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बँक अधिका-यांना आज दिल्यात.
         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आणि जिल्हा स्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. .भारती, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, नाबार्डच्या स्नेहल बन्सोड, सर्व बँकांचे व्यवस्थापक, समन्वयक अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
          जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, मागील वर्षी सर्व बँकांनी चांगले काम केले. आता आपल्याला त्यापेक्षाही जोमाने काम करून अधिकाधिक शेतक-यांना पीक कर्जाचा लाभ द्यावयाचा आहे. त्याकरीता मंडळस्तरावर लवकरच कर्ज मेळावे घेऊन पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतक-यांनाही मॉन्सून पूर्व हंगामात कर्ज उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून 31 मेपर्यंत हस्तलिखित सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी शेतक-यांना कर्ज अन्य शेतीविषयक कामासाठी हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
          पुढील बैठकीत गावनिहाय बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असून सर्व बँकांनी  त्या पुरवित असलेल्या सेवा क्षेत्रातील खातेदारांच्या माहितीसह उपस्थित राहावे. तसेच येणा-या अडचणींबाबत अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन त्याबाबत अवगत करावे. केवळ उद्दीष्टावर आधारीत कामगिरी पार पाडता उद्दीष्टाबाहेर जाऊन सामाजिक हिताच्या दृष्टीने पीक कर्जास पात्र शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केल्या.

75 कोटींचे पीक कर्ज वाटप
सन 2016-17 अंतर्गत खरीपासाठी जिल्ह्यातील 6 हजार 700 खातेदारांना सर्व बँकांनी मिळून 75 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती प्रारंभी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा यांनी दिली. तसेच मे 2016 पर्यंत उर्वरीत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, असे प्रास्ताविकात सांगितले. तसेच यावेळी रिजर्व बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम यांनीही पीक कर्जाबाबत माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment