Wednesday 1 June 2016

आमगावात बसला पहिला सौर कृषी पंप
Ø जिल्‍हयात 11 सौर कृषी पंप व्‍दारे सिंचन सुरु
Ø जिल्‍हाधिका-यांची हमदापूर, देऊळगाव ला  भेट
Ø शाश्‍वत सिंचनासाठी सौर कृषी पंप उपयुक्‍त
Ø हेमंत मोहरील ठरले पहिले मानकरी
वर्धा,दि.25-शेतीला शाश्‍वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्‍यासोबत शेतक-याना बारामाही पिक घेण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणा-या सौर कृषी पंप योजने अंतर्गत जिल्‍हयात पहिला सौर कृषीपंप आमगावच्‍या हेमंत मोहरील या शेतक-याकडे यशस्‍वीपणे कार्यान्वित झाला आहे.
            शेतकरी आत्‍महत्‍या ग्रस्‍त असलेल्‍या जिल्‍हयासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामध्‍ये सौरकृषी पंपाच्‍या एकूण किमतीच्‍या केवळ पाच टक्‍के रक्‍कम भरल्‍यानंतर लाभार्थ्‍याच्‍या शेतात सौरकृषी पंप बसविण्‍यात येत आहे. या योजनेमुळे विद्युत जोडणी पासून वंचित राहणा-या व पाच एकरापर्यंत शेती असलेल्‍या सर्व शेतक-याना लाभ मिळत आहे. शेतक-यांनी सौर कृषी पंप योजनेत सहभागी होवून बारामाही पिके घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
            सौर कृषी पंप योजने अंतर्गत जिल्‍हयात 11 सौर कृषी पंप बसविण्‍यात आले असून येत्‍या आठवडयात 28 पंप बसविण्‍याचे नियोजन आहे. जिल्‍हयाला 920 सौर कृषी पंपाचे उदि्दष्‍ट आहे. 176 सौर कृषी पंपाना पहिल्‍या टप्‍प्‍यात मंजूर करण्‍यात आले आहे.
            शेतक-यांनी आता निसर्गावर अवलंबून न राहता आपल्‍या शेतात पारंपारिक पिका ऐवजी रोख भाजीपाला, फळाची शेती करुन आर्थिक विवंचनेतून बाहेर पडावे. विजेचे कनेक्‍शन मिळण्‍यास पात्र नसलेल्‍या शेतक-यांना या योजनेचा प्राधान्‍याने लाभ मिळत असून सौर कृषी पंपामुळे विजेच्‍या बिलापासून कायमस्‍वरुपी मुक्‍ती मिळत आहे. शेतक-यांनी सौरकृषी पंप योजनेचा लाभ घेऊन भाजीपाला व फळबागासारखे बारामाही पिके घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलें आहे.
सेलू तालुक्‍यातील हमदापूर येथे सुधाकर मारोतराव डोणे, देवूळगावच्‍या भिमराव निंदे या शेतक-यांच्‍या शेतात बसविण्‍यात आलेल्‍या सौर कृषी पंपाला भेट देवून शेतक-यासोबत संवाद साधला.
            हमदापूरच्‍या सुधाकर डोणे यांचेकडे तीन एकर शेती असून शेतात विहिरीला पाणी असून केवळ विजेचे कनेक्‍शन नसल्‍यामुळे सिंचन करणे शक्‍य नव्‍हते सौर उर्जा कृषी पंपामुळे केवळ 16 हजार 200 रुपये भरुन 3 लक्ष 24 हजार रुपयाचा तीन एचपीचा पंप व सौर उर्जा पॅनल बसविण्यात आले. सौर कृषी पंपामुळे आता बारामाही पिके घेणे सुलभ होणार असून दरमहिन्‍याला विजेचे देयक भरावे लागणार नाही अशी प्रतिक्रिया त्‍यांनी यावेळी दिली.
जिल्‍हयात बसविलेल्‍या 11 सौर कृषी पंपाची यशस्‍वी चाचणी पूर्ण झाली आहे. सौर उर्जामुळे शाश्‍वत व निरंतर सिंचनाचा लाभ मिळणार असल्‍यामुळे पारंपारिक उर्जास्‍त्राताऐवजी अपारंपारिक नविन उर्जा स्‍त्रोताचा वापर शेतीसाठी किफायतशीर ठरणार आहे.
शेतक-यांनी सौर उर्जेचा वापर वाढविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे संपूर्ण सहयोग राहणार असून सात बारावर कुंटूबातील व्‍यक्‍तीचेएकत्र असलेल्‍या नोंदी ऐवजी हिस्‍सेवाटणीनुसार सातबारा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील व जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना या योजनेमध्‍ये समावेश करण्‍यात येईल. असे जिल्‍हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
प्रारंभी विज वितरण कंपणीचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे यांनी सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतक-यांचा सहभाग वाढत असून प्रत्‍यक्ष सौर पंप सुरु झाल्‍यानंतर ईतर शेतक-यांना याची उपयुक्‍तता माहिती होत आहे. शेतक-यांनी या योजनेत सहभागी होण्‍यासाठी आपला पाच टक्‍के सहभाग दयावा असे आवाहन केले.
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी श्रीमती स्मिता पाटील जैन इरिगेशनचे भागवत कुंभार , उपकार्यकारी अभियंता सुहास पडोळे, चंदन गावंडे, मिलिद माने उपस्थित होते.
जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी शेतक-यासोबत संवाद साधून कापूस, सोयाबिन या  पारंपारिक पिकाऐवजी भाजीपाला ,फळे ही रोख पिके घेवून आर्थिक स्‍वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी. यासाठी सौर कृषी पंपासाराख्‍या खर्च न येणा-या साधणाचा वापर करावा असेही त्‍यांनी सांगितले.
शेतीला सौर उर्जेचा आधार
वर्धा जिल्‍हयात सौर उर्जा कृषीपंप योजनेमध्‍ये पाच टक्‍के सहभाग भरलेल्‍या 11 शेतक-यांना प्राधान्‍य क्रमानुसार सौर उर्जा पंप महावितरण मार्फत बसविण्‍यात आले आहे. यामध्‍ये सेलू ,हिंगणघाट आणि वर्धा तालुक्‍यातील शेतक-यांचा सहभाग  आहे.
सौर कृषी (डिसी) बसविलेल्‍या शेतक-यांमध्‍ये सेलू तालुक्‍यातील राजु बाळसराफ (हिवरा), मिलींद शेंडे (दिंदोडा), हेमंत मोहरील (आमगाव), सुधाकर डोणे (हमदापुर), गजानन कांबळे, (हमदापुर), भिमराव जिंदे (देऊळगाव), क्रिष्‍णा भोमले (हमदापूर), नारायन चाटे (देऊळगाव), निलेश वाटगूळे (धानोरा), अल्‍लाउदीन शेख (हमदापुर), संजय मनोहर घोरपडे (वणी) ता. हिंगणघाट चा समावेश आहे.





            


No comments:

Post a Comment