Tuesday 14 August 2012

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत 496 गावे तंटामुक्‍त



         
         वर्धा, दि. 14 – महात्‍मा  गांधी तंटामुक्‍त गांव मोहीमे अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात राबविण्‍यात आलेल्‍या  विशेष उपक्रमामुळे 496 गावे तंटामुक्‍त झाली असून जिल्‍ह्यातील गुन्‍हेगारीचे प्रमाणही कमी होण्‍यास मदत झाली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिली.
       महात्‍मा गांधी तंटामुक्‍त  गाव मोहीमेचा शुभारंभ येत्‍या 15 ऑगस्‍ट पासून सुरु होत असून जिल्‍ह्यातील 51 गावामध्‍ये विशेष ग्रामसभा घेऊन महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम सहभागी  होण्‍याचा संकल्‍प करण्‍यात येणार आहे. तालुका व पोलीस स्‍टेशन स्‍तरावर या मोहीमेसाठी विविध समित्‍या गठित करण्‍यात आल्‍या असून 15 ऑगस्‍ट ते 30 एप्रिल पर्यंत तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहे.
       गाव तंटामुक्‍त व्‍हावे यासाठी  ग्रामीण भागातील जनतेची  मानसीकता बदलून गावातील तंटे सामोपचाराने  सोडविण्‍यासाठी तंटामुक्‍त  गाव मोहीमेतील  सदस्‍यांनी पुढाकार घ्‍यावा. असे आवाहनही जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी यावेळी केले.
       महात्‍मा गांधी तंटामुक्‍त  गाव मोहीमे अंतर्गत 6 व्‍या मोहीमेची आखणी  व जिल्‍ह्यातील  51 गावे  तंटामुक्‍त करण्‍यासाठी  राब‍वायच्‍या मोहीमे संदर्भात जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विशेष बैठक आयोजीत करण्‍यात आली होती. या बैठकीस अप्‍पर   पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील, पी.एस.देशमुख, पी.एन.बुरडे, एम.जे.नळे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदि उपस्थित होते.
        महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम  2007 पासून राबविण्‍यात येत असून मुल्‍यमापन समितीने तालुकानिहाय जिल्‍ह्यातील 496 गावे पात्र ठरविले असून 19 गावे अद्याप बाकी आहेत. मागील वर्षी 45 गावे तंटामुक्‍त पात्र ठरली होती.  ग्राम स्‍तरावर  तंटामुक्‍त गाव समितीने केलेल्‍या  विशेष कामगिरीमुळे  2010-11 या वर्षात 19 हजार 926 तंटे दाखल झाले होते त्‍यापैकी 10 हजार 36 तंट्याचा निपटारा झाला. 2011-12  या वर्षात 16 हजार 382 तंटे दाखल झाले होते त्‍यापैकी 5 हजार 998 तंटे सोडविल्‍या गेले. या तंट्यामध्‍ये दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर गुन्‍ह्यांचा समावेश होता.
                   तंटामुक्‍त गावांना 4 कोटी 40 लाख रुपयाचे बक्षिस
      महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गांव मोहीमे अंतर्गत सन 10-11 या वर्षात 204 गावे पात्र ठरली होती. या  गावांना 4 कोटी 40 लाख रुपयाचे  बक्षिस मिळाले आहे. यामध्‍ये  सर्वाधिक बक्षिस आर्वी पंचायत समितीमध्‍ये  27 गावांना 63 लक्ष रुपये तर पुलगाव तालुक्‍यातील 23  गावांना 58 लाख रुपयाचा पुरस्‍कार मिळाला आहे.
      जिल्‍ह्यातील पात्र गावांना मिळालेल्‍या बक्षिसामध्‍ये आष्‍टी 17 गावे  36 लाख रुपये, कारंजा 23 गावे 43 लाख रुपये, खरांगना 21 गावे 38 लाख रुपये, देवळी 24 गावे 52 लाख रुपये , समुद्रपूर 13 गावे 27 लाख रुपये , वडनेर 12 गावे 28 लाख रुपये, हिंगणघाट 13 गावे 22 लाख रुपये,  दहेगाव 7 गावे 16 लाख रुपये , सिंदी  6 गावे 11 लाख रुपये , सेलू 7 गावे 22 लाख रुपये , सेवाग्राम 11 गावे  24 लाख रुपयाचे बक्षिस मिळणार आहे.
      महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत जिल्‍हास्‍तरावर कार्यकारी समिती गठीत करण्‍यात आली असून, तालुका व ग्रामस्‍तरावरही  समितीची स्‍थापना  31 ऑगस्‍ट पर्यंत करण्‍याच्‍या सुचना जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिलेत.
      जिल्‍ह्यातील 19 गावे तंटामुक्‍त करायचे असून यामध्‍ये बोरगाव मेघे, सिंदी मेघे, नालवाडी, देऊळगाव, तरोडा, बोथुळा या गावांचा समावेश आहे. या गावांमध्‍ये तंटामुक्‍त गाव मोहीमे अंतर्गत राबवायच्‍या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून गावातील तंटे गावातच सोडविण्‍याचे दृष्‍टीने विशेष मोहीम राबविण्‍यात येईल अशी माहिती अप्‍पर पोलीस अधिक्ष टी.एस. गेडाम यांनी दिली.
      यावेळी महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीमेच्‍या समितीचे सर्व सदस्‍य उपस्थित होते.
                                                00000000


No comments:

Post a Comment