Saturday 26 November 2011

सवयींचा आरोग्‍यावर परिणाम !

मद्यपान, मांसाहार धुम्रपान आणि मेहनतीचा आभाव यामुळे विविध प्रकारच्‍या आरोग्‍य समस्‍या निर्माण होतात. आरोग्‍याची ही संपदा राखण्‍यासाठी प्रत्‍येकानं जागरुक रहायची गरज आहे.
- प्रशांत दैठणकर

भारतात गेल्‍या काही वर्षात आरोग्‍य सुविधांमुळे सरासरी आयुष्‍यमान उंचावले आहे मात्र दुस-या बाजूला नव्‍या प्रकारच्‍या आरोग्‍य समस्‍या समोर येत आहेत. यातील रक्‍तदाब तसेच हृदयविकार या समस्‍या नव्‍या जीवनशैलीमुळे वाढलेल्‍या आपणास दिसतील.
बहुतेक प्रकरणी आयुष्‍यात ताण-तणाव आल्‍याने या समस्‍या निर्माण होतात. त्‍याचसोबत व्‍यसनं आणि खाण्‍याच्‍या सवयी हे देखील एक कारण आहे. आजकाल यांत्रिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्‍याने शारिरीक श्रम कमी करावे लागतात त्‍यातूनही स्‍थुलता वाढते व या स्‍वरुपाच्‍या समस्‍या निर्माण होतात.
सतत मांसाहार तसेच मद्यपान, धुम्रपान गुटखा आदींचा एकत्रित परिणाम कधी ना कधी शरीर यंत्रणेवर होतो. प्रथम हृदयाची काळजी घ्‍यायला हवी. धुम्रपानाने हृदय तसेच फुफ्फुसांवर दिर्घकालीन परिणाम होतो. धुम्रपान करणा-यांना हृदयविकाराचा धोका तर असतोच सोबत कर्करोगाचाही धोका असतो.

हृदयविकारास कारणीभूत ठरणा-या घटकांपैकी एक म्‍हणजे चरबी होय. शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही याची सतत काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे वयाची चाळीशी ओलांडल्‍यावर किमान वर्षातून एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासण्‍या करुन घेतल्‍या पाहिजे.
सततचा मांसाहार हे चरबी वाढीमागचं एक कारण आहे. कारण मांसाहारातून आपणास प्रथिने मिळत असली तरी सोबत आपण भरपूर मसाले आणि तेलाचा वापर करतो. अशा आहाराचा उष्‍मांक (कॅलरी) अधिक असतो. त्‍या कॅलरीजचा वापर आपण केला नाही तर चरबीचे साठे जमायला सुरुवात होते. चरबी जमणं सोपं उतरवणं अवघड त्‍यामुळे लठ्ठपणा त्‍यापुढे रक्‍त दाब, हृदयविकार अशी मालिकाच सुरु होवू शकते.
आरोग्‍यम धनसंपदा असं म्‍हणतात ही संपदा जपावी हेच चांगलं.
- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment